
कौटुंबिक समस्यांमुळे भरकटलेल्या चिमुरड्यांबरोबरच रेल्वे स्थानक परिसरात चुकलेल्या तब्बल 194 मुलांना मध्य रेल्वेच्या आरपीएफने घराचा रस्ता दाखवला आहे. आरपीएफकडून ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबवली जाते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत सर्वाधिक मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले आहे. आरपीएफच्या या कारवाईबाबत पालकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
रेल्वे स्थानक परिसरात भटकणाऱ्या लहान मुलांवर आरपीएफचा वॉच असतो. एखाद्या मुलाच्या हलचाली संशयास्पद वाटल्यास त्याला ताब्यात घेऊन तो कुठून आला आहे, कशासाठी आला आहे याबाबत विचारपूस करून त्याच्या पालकांशी संपर्क साधला जातो. त्यानुसार मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत 144 मुले आणि 50 मुलींना सुखरूपपणे त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत पार पाडलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
























































