
>> राजेश चुरी
मंत्रालयात गेल्या काही महिन्यांपासून गर्दी वाढत आहे. पाच हजार कर्मचाऱयांच्या क्षमतेच्या पायाभूत सुविधांवर गर्दीमुळे दुप्पट भार पडत आहे. वीज, पाणी, लिफ्ट, कँटीन सुविधा व सुरक्षा व्यवस्थेवर ताण पडला आहे. त्यामुळे बँकेत ज्याप्रमाणे टोकन दिले जाते, त्याप्रमाणे व्हिजिटर्सना टोकन देऊन मंत्रालयात प्रवेश देण्याची शिफारस सामान्य प्रशासन विभागाने गृह विभागाला केली आहे.
मंत्रालयात खासकरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या सहाव्या मजल्यावर तर जत्रा असते. या गर्दीमुळे मंत्रालयीन कर्मचाऱयांपासून अगदी अधिकारी-सचिवांनाही वाट काढत पुढे जाणे कठीण होते. प्रत्येक मजल्यावरील मार्गिका, लिफ्ट, स्वयंचलित जिन्यांवर गर्दी उसळल्याने पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण पडतो. मंत्रालयात पाच हजार कर्मचारी काम करतात, पण दररोज सरासरी तीन ते पाच हजार व्हिजिटर्स येतात. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी तर पाच हजारांहून अधिक व्हिजिटर्स येतात. त्यामुळे सुविधांवर दुपटीने ताण पडत आहे.
सुविधांवर अनिर्बंध ताण
सध्या मंत्रालयात प्रवेश केल्यानंतर बाहेर पडण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. आत आलेला व्हिजिटर संध्याकाळी उशिरापर्यंत रेंगाळत असतो. सध्या उकाडा आहे. मंत्रालयात एसी असल्याने व्हिजिटर्स काम झाल्यावरही एसीची थंड हवा घेत बसतात. कँटीनमध्ये चहा, नाश्ता, जेवण घेतात. त्यामुळे मंत्रालयीन कर्मचाऱयांना कँटीन सुविधा अपुरी पडते. त्याशिवाय पाणी, लिफ्ट, विजेचा वापरही वाढतो.
गळय़ात व्हिजिटर पास गरजेचा
सामान्य प्रशासन विभागाने गृह विभागाला दोन ते तीन पत्रे पाठवून वेगवेगळे उपाय सुचवले आहेत. त्यामध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन बुकिंग, टोकन सिस्टम आणि दुपारी तीन ते पाच या वेळेतच प्रवेशाच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. मंत्रालयात प्रवेश करताना टोकन द्यायचे आणि व्हिजिटर पास द्यायचा. प्रवेश देण्यापूर्वी व्हिजिटरचे ओळखपत्र घ्यायचे आणि बाहेर पडताना व्हिजिटर पास परत करत ओळखपत्र परत द्यायचे, त्यामुळे आत आलेली व्यक्ती बाहेर पडली हे लक्षात येईल. आतमध्ये एका वेळेस ठरावीक संख्येत व्हिजिटर्सना प्रवेश द्यावा. ते बाहेर पडले की, मग दुसऱया व्हिजिटर्सना प्रवेश द्यायचा असा प्रस्ताव आहे.
सेंट्रल रजिस्ट्री युनिटमुळे गर्दी कमी
सरकारला निवेदने-तक्रारी देण्यासाठी येणाऱयांची प्रचंड संख्या लक्षात घेऊन मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच सेंट्रल रजिस्ट्री युनिट बांधण्यात आले आहे. त्यामुळे आता निवेदन देण्यासाठी आत येण्याची गरज राहिलेली नाही. परिणामी गर्दीवर थोडे नियंत्रण आले आहे, पण तरीही मंत्री कार्यालयातील गर्दी कमी होत नाही.
























































