समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ, CBI करणार वानखेडेंच्या कुटुंबियांची चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुललगा आर्यन खान याच्यावर कारवाई करणारे ‘NCB’चे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर ‘NCB’च्याच दक्षता समितीने ठपका ठेवला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार समीर वानखेडे यांच्यानंतर CBI चे पथक उद्या समीर वानखेडे यांची बहीण आणि वडिलांचीही चौकशी करणार असल्याचं कळतं आहे, असं वृत्त खासगी वृत्तवाहिन्यांवरून देण्यात आलं आहे. मात्र CBI कडून याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सामना या वृत्ताची पुष्टी करत नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या (मंगळवारी) सकाळी 10 वाजता समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची बहीण दोघेही CBI कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत, असं खासगी वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात आलं आहे. ज्या CBIच्या पथकाने समीर वानखेडे यांची चौकशी केले तेच पथक उद्या समीर वानखेडे यांची बहीण आणि वडिलांचीही चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे, असंही काही वृत्तसंकेतस्थळांवरून जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान, दक्षता समितीच्या अहवालाच्या आधारे ‘CBI’ने समीर, ‘NCB’चे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंग, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांच्यासह के. पी. गोसावी आणि सॅनविल डिसोझा या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असून, सीबीआयमार्फत या गुन्ह्याचा तपास देखील सुरू आहे.

आर्यनच्या सुटकेसाठी वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली, अशा आरोपाखाली ‘CBI’ने एफआयआर नोंदवला. याप्रकरणी समीर वानखेडे यांची सीबीआयच्या पथकाने सुमारे चौकशी केली. यानंतर वानखेडे यांनी CBI विरोधात याचिका केली. न्यायालयाने वानखेडे यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देऊन 8 जून पर्यंत अंतरिम संरक्षण दिले होते. त्यामुळे समीर वानखेडे यांना थोडा दिलासा मिळाला आहे.