‘एक ना धड….; विनायक राऊत यांचा फडणवीसांवर पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा आणि फॉर्म्युला तयार झाला नाही. शिवसेनेचे सर्वात जास्त खासदार निवडून आलेत. निवडून आलेल्या जागा कायम ठेवत शिल्लक राहिलेल्या जागांचं समान वाटप करायचं, असा फॉर्म्युला आला, तर सहानभुतीपूर्वक विचार होऊ शकतो, असे मत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा होईल. पण, कोणत्याही परिस्थितीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील. तसेच, प्रचंड बहुमताने जिंकत शिवशाहीची राजवट येईल, असा विश्वासही विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाबाबत वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, शिवसेनेची चिंता देवेंद्र फडणवीसांनी करण्याची गरज नाही. चंद्रकांत पाटील एकीकडे बोलत आहेत. दुसरीकडे बावनकुळे वेगळेच बोलत आहेत. एक ना धड बाराभर चिंद्या अशी तुमची स्थिती आहे. मिंधे गटाला बरोबर घेतल्यानंतर भाजपला लागलेल्या पनवतीची देवेंद्र फडणवीसांनी काळजी करावी, असा पलटवार राऊत यांनी केला आहे.