
हिंदुस्थानच्या रेल्वेची महाराणी अशी ओळख असलेली दख्खनची राणी अर्थात ‘डेक्कन क्वीन’चा आणि लाल डबा म्हणजेच सर्वसामान्यांच्या एसटीचा उद्या, गुरुवारी वाढदिवस आहे. डेक्कन क्वीनला उद्या 93 वर्षे, तर एसटीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. डेक्कन क्वीनमुळे देशाची आर्थिक राजधानी राज्याच्या सांस्कृतिक राजधानीशी जोडली गेली आहे, तर लाल परीमुळे राज्याच्या शहरांबरोबरच खेडीपाडी जोडली आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या ग्रेट इंडियन पेनिनसुला या रेल्वे कंपनीने पहिली लक्झरीयस ट्रेन सेवा म्हणून 1 जून 1930 रोजी मुंबई-पुणे मार्गावर ‘डेक्कन क्वीन’ एक्प्रेस सुरू केली होती. ही देशातील पहिली अतिजलद गाडी होती. सुरुवातीला या गाडीतून फक्त ब्रिटिश लोकच प्रवास करू शकत होते. पुढे 1943 मध्ये या गाडीतून हिंदुस्थानींना प्रवास करण्याची परवानगी दिली. तेव्हापासून या गाडीचा प्रवाशांना लळा लागला असून तो आजही कायम आहे. सुरुवातीला या मार्गावर प्रत्येकी सात डब्यांच्या दोन गाडय़ा धावत धावत होत्या. त्यापैकी एका गाडीचा रंग स्कार्लेट मोल्डिंगसह चंदेरी आणि दुसऱया गाडीचा सोनेरी रेषांसह रॉयल ब्ल्यू होता. या गाडय़ांच्या डब्यांच्या अंडर फ्रेम्स इंग्लंडमध्ये बांधण्यात आल्या होत्या तर कोचची बॉडी जीआयपी रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये बांधण्यात आली होती. या गाडीला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून अशिया खंडातील विजेवर चालणारी पाहिली इंटरसिटी ट्रेन आहे.
1 जून 1930 पासून डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला सात डबे होते. या गाडीत सुरुवातीला फक्त प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीची सोय होती. 1 जानेवारी 1949 रोजी प्रथम श्रेणी रद्द करून द्वितीय श्रेणीची प्रथम श्रेणी म्हणून पुनर्रचना करण्यात आली. एप्रिल 1974 पासून गाडीला 12 डबे जोडण्यास सुरुवात झाली. 1995 मध्ये डेक्कन क्वीन 12 डब्यांवरून 17 डब्यांची करण्यात आली. 15 ऑगस्ट 2021 ला डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडण्यात आला.
शनिवारपासून राज्यभरात एसटी रथ
एसटीचा 75 वर्षांचा इतिहास नव्या पिढीला कळावा म्हणून महामंडळाने ‘फिरता प्रदर्शन एसटी रथ’ तयार केला असून तो 3 जूनपासून राज्यभरातील प्रमुख बसस्थानकांवर नेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना तो पाहता येणार आहे.

























































