जर एकांगीच निर्णय घ्यायचा होता तर हे नाटक का केलं? सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर आमदार संजय शिरसाट यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी अंधारे यांच्याबाबत अश्लील वक्तव्य केले होते. त्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या तपास समितीने आपल्याला क्लिनचीट दिल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यावरून सुषमा अंधारे यांनी शिरसाटांवर निशाणा साधला आहे. तसेच या क्लिनचीटबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही सवाल केले आहेत.

”क्लिनचीट मिळाली असं हे त्यांना कुणी सांगितलं. स्वत: आरोपी कसा काय हे सांगू शकतो. क्लिनचीट मिळाली हे सर्वात आधी तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे. हा अहवाल त्यांनी महिला आयोगाकडे द्यायचा होता. पण महिला आयोगाकडे हा अहवाल आलाच नाही मग तो उघड कसा झाला. ही जबाबदारी आता कुणाची? तपास अधिकाऱ्याने कुठल्या आमिषाला बळी पडून हे केलंय का? की कुठल्या राजकीय प्रभावाखाली येऊन केलं आहे का? जो पोलीस अधिकारी असा पक्षपातीपणे वागतो त्याचं निलंबन झालं पाहिजे. मला त्या सवंग लोकप्रतिनिधीबद्दल काहीच बोलायचं नाही. मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे की, एखाद्या प्रकरणात चौकशी समिती नेमली असेल, ज्या फिर्यादीच्या म्हणण्यावर चौकशी समिती नेमली आहे. त्या फिर्यादीला त्याची कल्पना का दिली नाही, मला माहितच नाही की तपास अधिकारी महिला आहे की पुरुष आहे. चौकशी समिती असेल तर त्यांनी माझं म्हणनं ऐकून घ्ययला हवं होतं ते का घेतलं नाही? मला का बोलावलं नाही. मला टपाल व्हॉट्सअॅवरून नोटीस दिली का? मग एकांगी कसा निर्णय घेतला. जर एकांगीच निर्णय घ्यायचा होता तर हे नाटक का केलं? मग असं काही ठरलं आहे का फडणवीसांचं की त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्यांना काही करून वाचवायचं असं आहे का? याची उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली पाहिजे. कारण यांच्यात गृहमंत्र्यांचा पोलीस अधिकारी पक्षपातीपणे वाचला आहे. त्यामुळे फडणवीसांनी उत्तर द्यावं”, असे सवाल सुषमा अंधारे यांनी केले आहेत.

”संसद भवनाच्या बाहेर ज्या महिला खेळाडू आंदोलन करतायत त्यांची व माझी लढाई वेगळी नाही. त्या लढत होत्या कारण त्यांची तक्रार पोलीस लिहून घेत नव्हते. आता लिहून घेतली तर आरोपीला अटक होत नाहीए. माझीही तक्रार लिहून घेतली जात नाहीए. कोर्ट रजेवर होतं. बघू काय होतं ते. परंतू एकूण महिलांच्या बाबतीत सरकार किती असवंदेनशील आहे ते दिसतंय. सरकार पक्षातील महिलांबद्दल वेगळा न्याय व विरोधी पक्षातील महिलांबाबत वेगळा न्याय. सत्तेचा केवढा गैरव्यवहार सुरू आहे ते सगळ्यांना दिसतंय” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.