
>> दुष्यंत पाटील
अवघं बत्तीस वर्षांचं आयुष्य मिळालेल्या शुबर्टनं एकापेक्षा एक सुंदर संगीतरचना करत संगीताच्या इतिहासात कायमचं स्थान मिळवलं. एखाद्या गायक किंवा गायिका यांपैकी एकानं केलेलं गायन आणि त्या गायनाला पियानोची साथ या प्रकारच्या त्याने केलेल्या रचना अजरामर झाल्या.
कमी आयुष्य लाभूनही एकापेक्षा एक अजरामर रचना करणाऱ्या पाश्चात्य संगीतकारांमध्ये शुबर्टचं नाव अगदी वर येतं. अवघं बत्तीस वर्षांचं (आणि तेही अतिशय संघर्षाचं) आयुष्य मिळालेल्या शुबर्टनं एकापेक्षा एक सुंदर संगीतरचना करत संगीताच्या इतिहासात कायमचं स्थान मिळवलं. एखाद्या गायक किंवा गायिका यांपैकी एकानं केलेलं गायन आणि त्या गायनाला पियानोची साथ या प्रकारच्या त्याने केलेल्या रचना अजरामर झाल्या.
त्याच्या एका चरित्रात लिहिल्याप्रमाणे, शुबर्ट एकदा एका गावातून आपल्या शहराकडे परत येत होता. त्याच्यासोबत त्याचे बरेचसे मित्रही होते. वाटेत एका ठिकाणी ते लोक थांबले आणि तिथे भटकू लागले. शुबर्टला एका हॉटेलच्या बाहेर असणाऱ्या बागेत त्याचा मित्र भटकताना दिसला. हा मित्र गायक होता आणि त्याने शुबर्टने संगीत दिलेली गीतं गायली होती. मित्रमंडळींसहित शुबर्ट तिथे पोहोचला.
एक टेबलाभोवती आता शुबर्टचे सारे मित्र बसले. त्यांनी मद्यपान करायला सुरुवात केली. समोरच्या टेबलवर एक पुस्तक पडलं होतं. शुबर्टने ते पुस्तक हातात घेऊन चाळायला सुरुवात केली. पानं पलटता पलटता त्याचं लक्ष एका कवितेकडे गेलं. या कवितेने शुबर्टच्या मनाची पकड घेतली. लगेच त्याला या कवितेसाठी एक चाल सुचली! तो खुर्चीतून ताडकन उठला आणि त्या कवितेकडे बोट दाखवत उत्स्फूर्तपणे उद्गारला, ’(या कवितेसाठी) एक सुंदर चाल मला सुचली आहे. पण, माझ्याकडे संगीत लिहिण्यासाठी वापरतात तो कागद असता तर… तर मी मला सुचलेलं संगीत त्या कागदावर उतरवलं असतं.’
शुबर्टच्या एका मित्राने लगेचंच तिथलं मेन्यू कार्ड घेतलं आणि त्याच्या मागच्या बाजूला असणाऱ्या रिकाम्या पृष्ठभागावर रेषा काढल्या. यानंतर त्याने ते मेन्यू कार्ड शुबर्टला दिलं. शुबर्टने लगेचंच आपल्या डोक्यात चालू असणारं संगीत त्यावर उतरवलं. हॉटेलमध्ये रविवारची गर्दी असताना, लोकांचा कलकलाट सुरू असताना आणि वेटर लोकांची ऑर्डर घेण्यासाठी सर्वत्र धावपळ चालू असताना शुबर्टला फक्त त्याच्या डोक्यातलं संगीतच ऐकू येत होतं.
शुबर्टने चाल दिलेली ही कविता नेमकी कशी होती? शेक्सपिअरने ‘सिंबलीन’ नावाचं एक नाटक लिहिलं होतं. या नाटकात इंग्रजीमध्ये एक गीत येत होतं. या गीताचं जर्मन भाषेत झालेलं भाषांतर शुबर्टच्या हाती पडलं होतं. शुबर्टने या गीताला अशी चाल दिली होती की त्या चालीत शेक्सपिअरची मूळ रचनाही गायली जाऊ शकत होती.
या काव्यात एका प्रेमिकेच्या भावना व्यक्त होत होत्या. आपलं प्रेम असणाऱया व्यक्तीनेही आपल्यावर प्रेम करावं अशी इच्छा या काव्यात येत होती. शुबर्टने दिलेल्या संगीतात या काव्यातली आर्तता आणि आशा स्पष्टपणे जाणवत होत्या. या रचनेचं इंग्रजीमध्ये नाव होतं ‘सेरनेड.’ ‘सेरनेड’ हा शब्द एखाद्या प्रियकराने प्रेमिकेच्या घराबाहेर रात्री प्रेमिकेसाठी केलेल्या गायनासाठी किंवा वाद्यासाठी वापरतात.
शुबर्टने संगीत रचताना फक्त गायकाचं गायन आणि सोबत पियानोच्या संगीताची साथ या दोघांचाच समावेश केला होता. पण कालांतराने महान संगीतरचनाकार लिझ्स्ट याने या संगीताची अॅरेंजमेंट करत फक्त पियानोसाठीच संगीत रचलं. हे संगीत प्रचंड गाजलं. या संगीत रचनेच्या इतरही बऱयाचशा अॅरेंजमेंट्स झाल्या.
‘सेरनेड’ ही रचना म्हणजे शुबर्टची एक मास्टर पीस रचना होती. 1940 मध्ये शुबर्टच्या आयुष्यावर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा असणारा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शुबर्ट आणि एक इंग्रज नर्तकी यांची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटाचं नाव होतं- ‘शुबर्ट्स सेरनेड’!
आज जवळपास दोनशे वर्षं झाल्यानंतरही शुबर्टची ही रचना (schubert’s Serenade) इतकी लोकप्रिय का असावी हे पाहण्यासाठी आपण युटय़ुबवर ही रचना एकदा तरी ऐकायलाच हवी!





























































