गोल चेहऱयाचा मेकअप करताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येकाच्या चेहऱयाचा आकार निरनिराळा असतो. मेकअप करताना तुमच्या चेहऱयाची ठेवण लक्षात घेऊनच मेकअप करावा लागतो. त्यामुळे तुमचा लुक आणखीन खुलून येतो. तुम्हाला तुमच्या चेहऱयाचा आकार, तुमच्या चेहऱयाच्या आकारातील त्रुटी जर माहीत नसतील तर तुम्ही योग्य प्रकारे मेकअप करू शकत नाही.

गोल चेहऱयाचा आकार सर्व बाजूंनी विस्तृत असतो. त्यामुळे आणखी जास्त रुंदी त्यात जोडल्यास तुमच्या चेहरा जास्त मोठा दिसतो. अशा वेळेस तुम्हाला तुमचा चेहरा लंबगोलाकार आणि स्लिम कसा दिसेल यासाठी योग्य मेकअप करावा लागतो.

स्किन टोनप्रमाणे फाउंडेशनचा वापर करावा व फाउंडेशन योग्य रीतीने पसरवून झाल्यानंतर तुम्ही गोल चेहऱयावर काँटुरिंग करणे अत्यंत गरजेचे असते. गोल चेहऱयाचं मोजमाप केल्यास लक्षात येईल की, या चेहऱयाची उभी आणि आडवी उंची साधारण सारखीच असते. अशा वेळेस तुम्हाला तो स्लिम दाखवायचा असेल तर तुम्हाला गालाकडच्या बाजूला काँटूर करताना प्रथम काँटुरिंगची लाईन आखून घ्यावी लागेल. त्यानंतर चिक बोन्स जास्त असल्यास त्याच्यावरही तुम्हाला काँटुरिंग करावे लागेल. बऱयाच वेळा गोल चेहऱयामध्ये हनवटीखाली जाड भाग दिसतो आणि त्याला काँटूर करणे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही गोल चेहऱयावर काँटूर करता तेव्हा ते काँटूर पसरवताना वरच्या दिशेने योग्य रीतीने पसरले गेले पाहिजे. नाकावरही योग्य प्रकारे काऊंटर करून घेणे महत्त्वाचे असते. कपाळपट्टी जर मोठी असेल तर कपाळपट्टीवरही तुम्हाला काँटुरिंग करावे लागते. ते योग्य रीतीने ब्लेंडही करता आले पाहिजे. त्यानंतर चेहऱयाचा काही भाग हायलाईट करणेही महत्त्वाचे असते. अशा वेळेस प्रथम नाकावर, गालावरच्या ठिकाणी हनुवटीवर तुम्ही हायलाईट करून घ्या. हायलाईटरसाठी तुम्ही लाईट कन्सीलरचाही वापर करू शकता. त्यानंतर योग्य पावडरचा वापर करून पावडरने तुमचा केलेला फाउंडेशनचा बेस फिक्स करा. शक्य असेल तर मेकअप फिक्सरने तुम्ही तुमचे फाउंडेशन फिक्सही करू शकता.

– गोल चेहऱयाचा मेकअप करताना तुम्ही त्यांच्या डोळय़ांच्या मेकअपवर अधिक भर देणे गरजेचे असते. तसेच या
चेहऱयाच्या महिलांनी स्लिम लूक दिसेल असा मेकअप करावा. डोळय़ांवर तुम्ही डार्क शेडची आयशॅडो आयलायनर लावा.

– हेअरस्टाईल करताना कपाळपट्टीच्या वर बाऊन्स दिसेल अशा प्रकारची हेअरस्टाईल करावी तसेच कानाकडून हेअरचा काही भाग व उचलल्यास कपाळपट्टीही कमी भासेल.

– शिवानी दिनेश गोंडाळ
(मेकअप आर्टिस्ट)
[email protected]