
लोकसभा निवडणुकीसाठी मी उमेदवार आहे की नाही, यापेक्षा पक्ष ज्याला उमेदवारी देईल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यांना उमेदवारी फायनल करतील. त्याचा भाजपचे सर्व कार्यकर्ते प्रचार करतील, अशी स्पष्टोक्ती भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी देऊन आता पाऊल मागे नाही तर पुढे टाकायचे आहे, असे सांगत त्यांनी त्यांनी आमदार राम शिंदे यांच्या वक्तव्याला एक प्रकारे आव्हानच दिले. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना जर लोकसभेसाठी नगरमधून उमेदवारी मिळाली तर ही निवडणूक सुद्धा चांगली स्पर्धात्मक होईल, असे ते म्हणाले.
नगरमध्ये सध्या विखे आणि आमदार राम शिंदे यांच्यात शीत युद्ध सुरू आहे. भाजपमध्ये निष्ठावंत आणि बाहेरून आलेले असं युद्ध चांगलंच रंगलं आहे. त्यात विखे हे शिंदेंविरोधात अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकालाची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष भैया गंधे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, दिलीप भालसिंग उपस्थित होते.
आपण निवडणुकीला पुन्हा नगरमधून उभे राहणार का? असे विचारल्यानंतर खासदार विखे यांनी मी उमेदवार असेल-नसेल हे काही मला माहीत नाही. मात्र, पक्ष ज्याला उमेदवारी देईल व देवेंद्र फडणवीस ज्यांना उमेदवारी देतील त्यांच्यासाठी सर्वजण प्रचार करतील, असं उत्तर दिलं. नगर दक्षिण मतदार संघामध्ये काँग्रेसने माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी करावी, अशी मागणी केली. यावर खासदार सुजय विखे यांनी थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे. त्यांना जर संधी दिली तर या ठिकाणी स्पर्धात्मक अशी निवडणूक होईल असंही त्यांनी सांगितलं.
राम शिंदे यांनी मी एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे तुम्ही सुद्धा घ्या, असं आवाहन केलं होतं. त्यासंदर्भात विचारल्यावर खासदार विखे यांनी आता पाऊल मागे नाही तर आता पाऊस पुढे टाकायचे आहे असं म्हणत त्यांनी शिंदे यांच्या विषयाची एक प्रकारे खिल्ली उडवली आणि थेट बोलण्याचे टाळले. आम्हाला पुढे पाऊल टाकायचे असे म्हणत त्यांनी एक प्रकारे शिंदे यांना टोला लगावला.
मुकुंदनगरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये नेमके कोण आहेत याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काही लोक हे बाहेरून असे कृत्य करतात का? हे सुद्धा तपासले पाहिजे व त्या दृष्टिकोनातूनही तसेच सूचना दिल्या आहेत. तसेच या प्रकारांमध्ये जे जे कोणी दोष असतील त्यांच्या निश्चितपणे कारवाई केली जातील व त्यामध्ये पोलीस जरी असले तरी त्यांच्यावर कारवाई होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
































































