
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी येथे दुपारी 2 वाजून35 मिनिटाला अचानक वादळी वारा गडगडासह पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सुमारे पंधरा ते वीस मिनिट होता. या वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले असून. संसार उपयोगी साहित्य उघड्यावर पडले आहे. काही ठिकाणी मोठ मोठी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकाला दुखापत झाली असून. विद्युत खांब कोसळल्याने विद्युत तारा तुटल्या असून या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. सांगवी ते साकोळ रस्त्यालगत असलेले झाड रस्त्यावर उन्मळून पडले होते. यामुळे काही काळ वाहतुकीस रस्ता बंद झाल्याने स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली. या वादळामुळे ऊस पीक आडवे पडल्यामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.

























































