आभाळमाया – तेजाळ शुक्र धगधगतोय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वतःच्या अक्षाशी सुमारे 178 अंशाचा कोन करणारा शुक्र हा सूर्यापासूनचा दुसरा ग्रह आणि आपला शेजारी अंतर्ग्र्रह अनेक वैशिष्टय़े बाळगून आहे. शुक्रावर कोणी राहत नाही हे खरं आणि तिथे राहताही येणार नाही (नाहीतर इलॉन मस्कने तिथली मोहीमही हाती घेतली असती). मात्र तिथे राहण्याची कल्पना केली तर त्याच्या विलक्षण कलत्या अक्षामुळे सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळताना भासेल. त्यामुळे ‘सूर्य आज पश्चिमेला उगवला का?’ असा उपरोधिक प्रश्न शुक्रावर सत्यात उतरणारा आहे.

शुक्र ग्रहाचं वातावरण सल्फर आणि कार्बन यांच्या दाट ढगांनी पूर्णपणे व्यापलेलं असल्याने पृथ्वीवरून निरभ्र काळोख्या रात्री जसं विराट विश्वाचं दर्शन घडतं तसं शुक्रपृष्ठावर उभं राहून शक्यच होणार नाही. मात्र अशा दाट ढगांच्या वातावरणामुळेच सूर्यप्रकाशाचं प्रचंड परावर्तन होऊन पृथ्वीच्या 20 टक्के लहान असलेला शुक्र कमालीचा तेजस्वी दिसतो आणि कविवर्य भा. रा. तांबे यांची ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी’ ही उक्ती सार्थ ठरते.

शुक्राच्या वैशिष्टय़ांची मालिकाच आहे. सूर्यापासून सुमारे 10 कोटी आणि पृथ्वीपासून 5 कोटी किलोमीटर अंतरावर असणारा शुक्र चंद्राप्रमाणेच विविध ‘कला’ दाखवणारा आहे. शुक्राची प्रतिपदा पिंवा अष्टमी पिंवा पौर्णिमा आपण दुर्बिणीतून सहज पाहू शकतो. त्याच्या ‘पौर्णिमे’ला तो एवढा तेजस्वी दिसतो की, शक्तीशाली दुर्बिणीतून पाहिल्यास शुक्राच्या परावर्तित प्रकाशाने (त्याला वैज्ञानिक भाषेत अल्बिडो असं म्हणतात) डोळे अक्षरशः दिपतात.

शुक्राचा पृष्ठभाग मात्र पृथ्वीसारखाच टणक आहे. नव्वद टक्के बेसॉल्ट पिंवा ज्वालामुखीजन्य दगडाने तो बनला असून एकूण शुक्रपृष्ठावर लाव्हारस ओसंडून झालेलं पठार सुमारे 65 टक्के आहे. शुक्रावर प्रचंड प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड असण्याचं कारणच एकेकाळी तिथे उसळणाऱया ज्वालामुखींमध्ये आहे. 500 कोटी वर्षांपूर्वी शुक्रावर ज्वालामुखींचे जे सततचे उद्रेक झाले, त्यातून अनेक प्रकारचे वायू बाहेर पडले आणि कार्बन डायऑक्साईड मोठय़ा प्रमाणावर वातावरणात साचून राहिला.
या उसळत्या ज्वालामुखींमुळे शुक्रपृष्ठाचा भाग काही ठिकाणी उचलला गेला आणि त्यातूनच मॅमॉक्स नावाचा तब्बल आठ किलोमीटर उंचीचा पर्वत या ग्रहावर तयार झाला. आपल्या ग्रहमालेतील सर्वात मोठा पर्वत म्हणजे माऊन्ट ऑलिम्पस. तो मंगळ ग्रहावर असून त्याची उंची अकरा किलोमीटर आहे. आपल्या पृथ्वीवरच्या ‘एव्हरेस्ट’चा क्रमांक यात तिसरा लागेल.

लाखो वर्षांपूर्वी धगधगणारे आणि शुक्राचं आकाश कायमचं काळंकुट्ट करून टाकणारे ज्वालामुखी कालांतराने थंडावले. मात्र अशा सततच्या मेघाच्छादित आकाशामुळे शुक्रावरून ‘आकाशदर्शन’ तर शक्य नाहीच, पण तिथे श्वासही घेता येणं अशक्य. पृथ्वीच्या वातावरणातील दोन टक्के कार्बनमध्ये पिंचित वाढ झाली तरी जगाचा म्हणजे पृथ्वीवरच्या सजीवांचा जीव घुसमटतो. मग 90 टक्के कार्बन डायऑक्साईड म्हणजे भीषणच.

शुक्र ग्रहाच्या निर्मितीनंतर तिथल्या टिकलाइक पिंवा लहरी ज्वालामुखींनी सगळय़ा ग्रहाची अगदी काहिली केली. पृथ्वीवर असे ज्वालामुखी नाहीत. याशिवाय शुक्रपृष्ठावरच्या ज्वालामुखींमधून सुरुवातीच्या लाखो वर्षांत फॉस्फाईन म्हणजे फॉस्फरस आणि हायड्रोन वायूंचे लोटच्या लोट वातावरणात भिरकावले गेले. त्यातून शुक्रावरचं वातावरण (आपल्या दृष्टीने) नैसर्गिकरीत्या प्रदूषित झालं. अर्थात त्याविषयी तक्रार करायला तिथे कोणीच नाही आणि जाण्याची शक्यताही नाही.

शुक्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी गेलेल्या ‘मॅजेलॅन’ यानाने आता या ग्रहाचं 95 टक्के मॅपिंग केल्यामुळे पूर्वी तिथे उसळणाऱया एक हजाराहून जास्त ज्वालामुखींचा पत्ता लागला आहे. शुक्रावर ‘शिल्ड’ ज्वालामुखी आहेत तसे सुप्त आणि काही जागृत ज्वालामुखी पृथ्वीवरही आहेत. हवाई बेटांवरचे ज्वालामुखी अधूनमधून उसळतात. वातावरणात राख, कार्बन फेकतात पिंवा जवळच्या बेटांवर त्सुनामी आणतात.

गेल्या 25 कोटी वर्षांत शुक्रावरच्या ज्वालामुखींनी मात्र चांगले 70 किलोमीटर उंचीपर्यंतचे अग्नी फवारे उडवले आहेत. त्यातून लोह, मॅग्नेशियम असे धातूही बाहेर पडलेत आणि वातावरणाशी संयोग होऊन होणाऱया वादळांमुळे तिथे विजांचा लखलखाट सतत सुरू असतो.

शुक्रावरचा एक पसरट (कॉम्पॉझिट) ज्वालामुखी 65 किलोमीटर व्यासाचा आहे. त्याला ‘पॅनकेक’ ज्वालामुखी म्हटले जाते. आपल्याला 2020 पासून ‘मॅजेलॅन’ यानाने शुक्राची अशी बरीच माहिती पुरवली असून आपल्याला आपल्या ग्रहमालेचा (आणि आपल्याही ग्रहाचा) पुरता शोध लागायचा बाकी आहे.

परंतु तेजस्वी शुक्र सध्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर छान दिसतोय. तो जरूर पहा. पाऊस सुरू होण्यापूर्वी सहज दिसणाऱया ग्रहांपैकी शुक्राचं पश्चिमेला उगवणं आणि पश्चिमेलाच मावळणं सध्या सुरू आहे. त्याचं तेजाळ रूप मोहित करणारं आहे यात मात्र शंका नाही!

– [email protected]