
उन्हाच्या तडाख्याने सगळेच कासावीस झाले असताना अखेर नैऋत्य मोसमी पावसाची आनंदवार्ता आली आहे. मान्सूनने आज दणक्यात केरळमध्ये एंट्री केली असून राज्याचा बराचसा भाग आणि दक्षिण तामीळनाडू मान्सून सरींनी चिंब झाला आहे. मान्सूनच्या आगमनाची हवामान विभागाकडून वर्दी देण्यात आली आहे. दरम्यान, मान्सूनच्या आगमनासाठी महाराष्ट्राला 16 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मान्सून दरवर्षी साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो. यंदा थोडा उशिरा म्हणजे 4 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केला गेला होता, मात्र अरबी समुद्रात उठलेल्या ‘बिपरजॉय’ वादळामुळे मान्सूनची प्रतीक्षा लांबली आणि अंदाजापेक्षा चार दिवस आणि दरवर्षीपेक्षा सात दिवस उशिराने मान्सूनने केरळात प्रवेश केला.
मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण असून केरळच्या 95 टक्के भागांत आज पाऊस पडत आहे. दक्षिण तामीळनाडूतही मान्सून दाखल झाला असून पुढच्या काही तासांत कर्नाटकचा दक्षिण भागही मान्सूनसरींनी सुखावणार आहे.
वादळ कराचीकडे, तरीही…
राज्याच्या किनारपट्टीवर घोंघावणारे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सध्या तरी कराचीच्या दिशेने वळले आहे. त्यामुळे राज्याच्या आपत्कालीन विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी सज्जता अजून कायम ठेवली आहे. मागील दोन-तीन चक्रीवादळांचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला होता. ते पाहता राज्याच्या आपत्कालीन विभागाचे अधिकारी हवामान खात्याच्या सतत संपका&त आहेत. यांत्रिक नौका खोल समुद्रात मासेमारी करतात. या सर्व नौकांना माघारी बोलावण्यात आले आहे. प्रवासी वाहतूकही पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
केरळनंतर पुढच्या साधारण 7 ते 8 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात पोहोचतो. त्यानुसार 15 ते 16 जूनपर्यंत तळकोकणात मान्सूनचे आगमन होणे अपेक्षित आहे. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात मान्सूनला थोडा विलंब होण्याची शक्यता राज्य आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिकाऱयांनी व्यक्त केली.
अंदाज आणि प्रत्यक्ष आगमन
2021 31 मे – 3 जून
2022 27 मे – 29 मे
2023 4 जून – 8 जून




























































