गीत नजाकत – गदिमा: काही खास ‘जागा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>जयंत कुळकर्णी 

मराठी साहित्यात शब्दप्रभू ग. दि. माडगूळकरांचे स्थान वादातीत आहे. या माणसाच्या लेखणीतून उतरलेल्या अनेक गीतांनी गेल्या तीन-पिढय़ांचे मराठी भावजीवन समृद्ध केले आहे. त्यांचे काव्य, विशेषत भावगीते व चित्रपट गीते ही सहजसुंदर, गेय तर आहेतच, पण गदिमा काही ठिकाणी एखादा गायक जशी गाताना एखादी खास ‘जागा’ घेतो तसे एखादा शब्द असा काही लिहून जातात की, त्यातून अर्थ किंवा गेयतेच्या दृष्टीने एक सौंदर्यस्थळ निर्माण होते. कधी कधी प्रथमदर्शनी अशी जागा लक्षात येत नाही. पण नंतर वाचनात किंवा श्रवणात जाणवलेल्या अशा काही खास ‘जागा’ येथे देत आहे.

 ‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटातील ‘गंगा आली रे अंगणी’ या समूह गीतातील या ओळी पहा.

‘युग यंत्राचे आले रे अवघड सोपे झाले रे 

घाम पुन्हा ना गळो कुणाचा कोठे निष्कारणी’ 

या ‘निष्कारणी’ शब्दातून गदिमा फार मोठे सत्य सांगून जातात. यंत्रामुळे निष्कारण घाम गाळणे थांबले आहे तरी यंत्रे मानवाची सर्वच कामे करणार नाहीत व काही ठिकाणी मानवाला ‘सकारण’ घाम गाळावाच लागेल. अर्थात मानवी कष्टाला पर्याय नाही, माणसाला कर्तव्य चुकलेले नाही. माणसाने यंत्रावर सारे काही सोपवून आळशी बनू नये, असा इशारा एका शब्दाच्या सहज, पण नेमक्या योजनेतून गदिमांनी दिला आहे.

‘प्रपंच’ या चित्रपटातील ‘विठ्ठला, तू वेडा कुंभार’ या गीतातल्या ओळी

‘माती, पाणी, उजेड, वारा 

त्यात मिसळशी सर्व पसारा 

आभाळच मग ये आकारा 

तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार’ 

यात कुंभार त्याने तयार केलेली मडकी (घट) एकमेकावर रचून ठेवतो. खालच्या ओळीत जास्त व वरच्या ओळीत थोडी कमी अशी ती रचना असते. त्याची एक ‘उतरंड’ तयार होते.  ती उतरंड आहे तो ‘ढीग’ नाही. तसेच विठ्ठलाने निर्मिलेल्या घटांनाही ‘तो’ एका ‘रचनेत’ ठेवतो हे गदिमांनी सूचित केले आहे. ‘उतरंड’ हा शब्द गेयतेच्या दृष्टीने कठीण असला तरी सुधीर फडक्यांनी तो  सुरेल म्हटला आहे.

 ‘घननिळा लडिवाळा, झलवु नको हिंदोळा’ या गीतातही वेगळ्या ढंगाची जागा आहे. मराठीत ‘ळ’ अक्षर काव्यात फारसे वापरलेले नाही, असे कोणीतरी उपहासाने म्हटल्याने गदिमांनी उत्तरादाखल ‘घननिळा लडिवाळा‘ हे 13 वेळा ‘ळ’चा वापर केलेले गीत लिहिले, असे सांगतात. ‘सांज वेळ ही आपण दोघे, अवघे संशय घेण्याजोगे’ या ओळीत गदिमांनी ‘अवघे’च्या ऐवजी ‘सगळे’ संशय घेण्याजोगे असे लिहिले असते तर आणखी एक ‘ळ’युक्त शब्द आला असता, पण या महाकवीने ‘अवघे’ हा शब्द वापरून ‘दोघे, अवघे, निघे’ अशी रचना करून एक वेगळी रंगत आणली आहे. ‘सारे, सगळे’यापेक्षा ‘अवघे’मध्ये अधिक ‘समावेशकता, व्याप्ती’ आहे असा भास होतो. गाताना माणिक वर्मांनी ‘अवघे’तला ‘घे’ किंचित लांबवून त्यात एक अर्थपूर्ण गंमत केली आहे.  कुमार गंधर्वांबद्दल लिहिताना पु.ल. म्हणाले आहेत की, “त्यांच्या पुढय़ात स्वर हात जोडून ‘हमारे लायक कुछ सेवा है’ म्हणत उभे असायचे!” गदिमांच्या बाबतीत हेच वाक्य ‘स्वर’ऐवजी ‘शब्द’ एवढा बदल करून तंतोतंत लागू पडतो.