
लोअर परळ येथील एका पबमध्ये पार्टी करून घराकडे निघालेल्या पाच जणांना सेनापती बापट मार्गावर मोठय़ा अपघाताला सामोरे जावे लागले. अंधेरीच्या दिशेने सुसाट निघालेली कार शुक्रवारी पहाटे रस्ता दुभाजकावर आदळून पुढे डाव्या बाजूला असलेल्या फुटपाथवर जाऊन धडकली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताला कारणीभूत ठरलेला चालक सुखरूप आहे.
सुनील दत्तवाणी (29), सतीश यादव (31), केविन पिल्लई (38), साद अन्सारी (37) आणि सुदर्शन झिंजुरटे (30) असे पाच जण गुरुवारी रात्री पार्टी करण्यासाठी ना. म. जोशी मार्ग परिसरातील एका पबमध्ये गेले होते. पार्टी केल्यानंतर ते सर्व जण त्यांच्या किया सेल्टोस या कारने घरी निघाले होते. सुदर्शन हा गाडी चालवत होता. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास 100 हून अधिक गतीने असलेल्या कारवरचे सुदर्शनचे नियंत्रण सुटले. परिणामी कार सेनापती बापट मार्गावरील रस्ता दुभाजकावर आदळून माधानी इस्टेटच्या समोरील फुटपाथवर जाऊन धडकली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन कारमध्ये अडकलेल्या पाचही जणांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून लगेच केईएम रुग्णालयात नेले, मात्र तेथे उपचार सुरू असताना सकाळी सहाच्या सुमारास सुनील आणि सतीश यांचा मृत्यू झाला, तर केविन आणि साद यांची प्रकृती चिंताजनक आहे. भीषण अपघात होऊनही चालक सुदर्शन त्यातून बचावला. तो जखमी झाला, मात्र सुखरूप आहे. सादचा स्वतःचा गारमेंटचा व्यवसाय होता. सुनील पबमध्ये संगीत संयोजकाचे काम करत होता, तर सुदर्शन ब्रोकरचा व्यवसाय करतो. उर्वरित दोघे काहीही कामधंदा करत नव्हते. या अपघाताप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात चालक सुदर्शनच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.































































