
देशातील महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक म्हणजे इंधन दरवाढ. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानावर थेट परिणाम करणाऱ्या महागाईच्या मुळाशी असलेल्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण इंधन दरवाढ हे असतं. सध्या देशात पेट्रोल आणि डीझेलने शंभर आकडा गाठला आहे. पण, लवकरच त्यांच्या किमतीत घट होईल अशी शक्यता असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा विचार करू शकतात, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शनिवारी दिली आहे. भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तेल कंपन्यांच्या कामगिरीवरही त्यांच्या किमती अवलंबून असतील, असंही यावेळी ते म्हणाले. जर या कंपन्यांनी पुढील तीन महिन्यांत चांगली कामगिरी केली, तर इंधन दरात कपातीचा निर्णय होऊ शकतो, असे संकेत पुरी यांनी दिले आहेत.
2024मध्ये येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांना नजरेसमोर ठेवून मोदी सरकारने हा दरकपातीचा संकेत दिलेला आहे, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत. देशातील विरोधी पक्षांकडून इंधनाच्या दरवाढीवर सातत्याने टीका होत असते. त्या पार्श्वभूमीवर पुरी यांचा हा संकेत महत्त्वाचा मानला जात आहे.



























































