
आपत्कालीन परिस्थितीत रेल्वेच्या मोटरमनबरोबरच गार्डचे लक्ष वेधण्यासाठी असलेल्या आपत्कालीन साखळीने मध्य रेल्वे हैराण झाली आहे. मे महिन्यात सुट्टीमुळे लोकलसह सर्वच रेल्वे गाडय़ांना मोठी गर्दी होती. तेव्हा पुरेशा कारणाशिवाय तब्बल 941 वेळा चेन पुलिंग झाल्याचे समोर आले आहे. त्याचा रेल्वेच्या वेळापत्रकावर आणि गाडय़ांच्या वेगावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे रेल्वेने तब्बल 711 जणांवर गुन्हा दाखल करत दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वेकडून उपनगरीय लोकल सेवेबरोबरच लांब पल्ल्याच्या गाडय़ाही चालवल्या जातात. त्या गाडय़ा नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यासाठी रेल्वेकडून आटोकाट प्रयत्न केला जात असला तरी त्याला हुल्लडबाज प्रवाशांकडून सुरुंग लावला जात असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुरेशा कारणाशिवाय चेन पुलिंग केल्याप्रकरणी आरपीएफने 711 जणांना दोषी ठरवत 2 लाख 71 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच बेकायदेशीरपणे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱया 52 दलालांवरही कारवाई करण्यात आली आहे.

























































