पुराचा अलर्ट मिळणार, आपत्कालीन स्थितीसाठी 58 हॉटलाइन! पावसाळय़ासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुराचा अलर्ट देणारी आयफ्लोज यंत्रणा आणि 24 वॉर्डसाठी स्वतंत्र 58 हॉटलाईन सुविधा पालिका यावर्षी पावसाळ्यासाठी तैनात ठेवणार आहे. शिवाय तात्पुरता निवारा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक आणि मोबाईल अॅप सुविधाही मुंबईकारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पालिकेने यंदा पावसाळ्यासाठी मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आयफ्लोज (IFLOWS) प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्यामार्फत संयुक्तरीत्या पूरप्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच 24 प्रशासकीय कार्यालयांमध्ये ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ कार्यान्वित करण्यात आली आहे. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने यंदाच्या पावसाळ्यासाठी विविध यंत्रणांसोबत सुसज्जतेसाठी समन्वय साधला आहे. पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार महानगरपालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत. त्यासोबतच 58 हॉट लाईन्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय महानगरपालिकेची 24 प्रशासकीय विभाग कार्यालये, 6 मोठी रुग्णालये व 28 बाह्य यंत्रणांना जोडण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांमार्फत बृहन्मुंबईत बसविण्यात आलेल्या 5361 सीसीटीव्ही कॅमेऱयांचे थेट प्रक्षेपण पाहण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा आपत्कालीन कक्षात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

असा मिळणार पुराचा अलर्ट
आयफ्लोज प्रणाली ही मान्सून कालावधीत हवामान अंदाज व पर्जन्यवृष्टीचे निरिक्षण करुन संभाव्य पूर परिस्थितीची आगाऊ सूचना देणारी प्रणाली आहे. ही प्रणाली 6 ते 72 तास अगोदर संभाव्य पूर-प्रवण क्षेत्रांना सतर्कतेचा इशारा देण्यास सक्षम आहे. तसेच या प्रणालीमार्फत संभाव्य पूरप्रवण क्षेत्रे, पुराच्या पाण्याची संभाव्य उंची, सर्व 24 विभागीय क्षेत्रांमधील स्थाननिहाय समस्या आणि पुराच्या संपर्कात येणाऱया घटकांची असुरक्षितता आणि जोखीम यांची माहिती प्राप्त होणार आहे. पूरपरिस्थितीच्या मूल्यांकनासाठी समुद्रास असणारी दैनंदिन भरती तसेच 4.5 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटांची भरती विचारात घेण्यात आलेली आहे.

अशा आहेत सुविधा
महापालिकेची 24 प्रशासकीय विभाग कार्यालये, 6 मोठी रुग्णालये व 28 बाहय यंत्रणांना जोडणा-या 58 हॉट लाईन्स कार्यरत. आणीबाणीप्रसंगी महापालिका आयुक्त, सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्यातील संदेशवहन सुलभ व्हावे याकरिता अतिमहत्त्वाच्या 61 ठिकाणांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांच्या वाहनांमध्ये अत्याधुनिक डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली कार्यान्वित.

हेल्पलाईन 1916 क्रमांकाच्या 30 लाईन्स हंटींग सुविधेसह थेट दूरध्वनी क्रमांक – 22694725 / 27, 22704403 फॅक्स- 22694719 कार्यरत आहेत. पालिकेतील मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात काही समस्या उद्भवल्यास समन्वय कार्य अबाधितपणे व्हावे यासाठी पर्यायी नियंत्रण कक्ष (Backup Control Room) परळ परिसरातील साईबाबा मार्गावरील बेस्ट वसाहतीच्या शेजारी असणाऱया शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत सुरू करण्यात आलेला आहे.

पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी पूर प्रतिसाद पथकामध्ये 123 अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्यात आले आहेत. या कर्मचाऱयांना वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला कमानी, चेंबूर, मरोळ व बोरीवली या अग्निशमन केंद्रांवर तैनात करण्यात आले आहे. संभाव्य पूर परिस्थिती दरम्यान आवश्यक असणारी जीवसंरक्षक सामुग्री वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला कमानी, चेंबूर मरोळ व बोरीवली येथील अग्निशमन केंद्रांवर तैनात ठेवण्यात आली आहे.