
शासनाच्या मध्यान्ह भोजन योजनेतील त्रुटींबाबत आमदार वैभव नाईक यांच्यासह बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी या योजनेचा लाभ न घेणाऱ्यांची नावेसुद्धा नोंद केली जात असल्याचे बांधकाम पदाधिकाऱ्यांनी यावेळी उघड केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून शासनाने जाहीर केलेल्या मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ हा जिल्ह्यात दुपारी 4000 तर तर दुपारी व रात्री 2200 असे मिळून सहा हजार दोनशे कामगाराची नोंद झाली आहे. मात्र किती जण लाभ घेतात याबाबत प्रश्नचिन्ह आहे. या योजनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी बांधकाम कामगार संघटनेने दोन दिवसांपूर्वी जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघ जिल्हाध्यक्ष बाबल नांदोस्कर, रवींद्र साळकर, संजय बावलेकर यांच्या नेतृत्वाखाली या मध्यान्ह भोजन योजनेचे अधिकारी यांची भेट घेतली. मध्यान्ह भोजन योजनेबाबत असणाऱ्या समस्या त्यांनी मांडल्या. मात्र त्यांना अधिकार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती.
दरम्यान मंगळवारी या बांधकाम कामगार संघटनांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ एमआयडीसी या ठिकाणच्या या योजनेच्या प्रकल्प कार्यालयाला भेट दिली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, राजु गवंडे, गोट्या चव्हाण तसेच बांधकाम कामगार संघटनेचे बाबल नांदोसकर, रवींद्र साळकर, संजय बावलेकर, अनिल कदम, विनायक मेस्त्री, महादेव वरवडेकर, प्रकाश चव्हाण, संतोष मार्गी, राजन नांदोसकर आदी उपस्थित होते.
यावेळी नांदोसकर व बावलेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कामगारांना हे भोजन मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याने हे कामगार ही भोजनथाळी घेत नाहीत, असे असताना जे कामगार भोजन घेत नाहीत अशांची सुद्धा रजिस्टरमध्ये नोंद केली जात असल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले गेले. त्यामुळे नाईक यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान याबाबत बांधकाम कामगारांच्या ज्या काही समस्या आहेत, त्याबाबत आमदार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उपायुक्त ,मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच बांधकाम अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन या बैठकीत त्याबाबत चर्चा होणार असल्याचे नांदोसकर व बावलेकर यांनी यावेळी सांगितले. ज्या कामगारांना भोजन थाळी ही निकृष्ट दर्जाची मिळत असेल तर त्यांनी नांदोसकर, बावलेकर, साळकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नांदोसकर यांनी केले आहे.



























































