
कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर 19 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश काढणाऱया जिल्हा प्रशासनानेच ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी गर्दी जमविल्याचे दिसून आले. लाभार्थ्यांच्या गर्दीसाठी 700हून अधिक एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्या. त्यामुळे इचलकरंजी, राधानगरीसह जिल्ह्याच्या बहुतांशी सर्वच डेपोंतील प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवाशांचा यामुळे खोळंबा झाला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी सकाळपासूनच शहरातील विविध मार्गांवर पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक करण्यात येत होती. विमानतळावरही पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्री तासभर उशिरा दाखल झाल्याने विमान प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला. शासनआदेशानुसार जिल्ह्यातील इचलकरंजी, राधानगरी आदी बस स्थानकांतील 450पेक्षा जास्त एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्याने त्याचा फटका दररोज प्रवास करणाऱया प्रवाशांना बसला. बहुतांशी बसेस ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमास नागरिकांना ने-आण करण्यासाठी पाठविण्यात आल्याने इतर प्रवाशांना बसेस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे लांब पल्ल्यावरून आलेले प्रवासी, तसेच इचलकरंजी बस स्थानकातून पुढील प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांतून संताप व्यक्त होत होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बस स्थानकात धाव घेऊन अधिकाऱयांना धारेवर धरले. यावेळी अधिकाऱयांनी शासनआदेशानुसार बसेस नियोजित कार्यक्रमासाठी गेल्या असल्या, तरी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे सांगत हात झटकले. त्यानंतरही गैरसोय झाल्याने प्रवाशांनी वडापसह इतर वाहनांद्वारेच प्रवास करणे पसंत केले.
लाभार्थी ताटकळले
नियोजित वेळेपेक्षा दीड-दोन तास कार्यक्रमाला उशीर झाल्याने शहराबाहेरून आलेल्या लाभार्थ्यांना नाहक ताटकळत बसावे लागले. जिल्ह्यातील विविध एसटी आगारांच्या साडेचारशेहून अधिक एसटी बसेस आणि जिल्ह्याबाहेरील साडेतीनशे अशा 716 एसटी बसेसमधून जिल्ह्यातील 12 तालुक्यांतील 1227 गावांमधून 28 हजार 640हून अधिक लाभार्थ्यांना आणण्याचे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. ज्या-त्या गावातून या लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणे व पुन्हा त्यांच्या गावी पोहोचविणे यासह पाणी, नाश्ता व भोजन यांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
शिवसैनिकांना रोखले
आपले सरकार सर्वसामान्यांचे असल्याचे सांगणाऱया शिंदे सरकारला जनतादरबारात जनतेचे प्रलंबित प्रश्न कधी सोडविणार? असे विचारण्यास गेलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांना पोलिसांकडून अटकाव करण्यात आला.




























































