शॉक लागून एसी मेकॅनिकचा मृत्यू 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे येथील एका प्रसिद्ध रुग्णालयात एसी दुरुस्तीच्या कामादरम्यान शॉक लागून एसी मॅकेनिकचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद खान असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी पंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद हा मूळचा बिहारचा रहिवासी होता. तो दोन वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. मोहम्मद हा एसी दुरुस्तीचे काम करायचा. तीन दिवसांपूर्वी मोहम्मद हा त्याच्या एका सहकाऱ्यासोबत एसी दुरुस्तीसाठी रुग्णालयात आला. त्या दोघांनी रुग्णालयातील मेडिकल स्टोअर आणि एमआरआयच्या आऊट डोअर येथील तपासणी केली. सायंकाळी मोहम्मद हा बेसमेंट एमआरआय आऊट डोअरच्या तपासणीसाठी गेला. बराच वेळ झाल्यानंतर मोहम्मद न आल्याने त्याचा सहकारी त्याला शोधायला गेला तेव्हा मोहम्मद हा त्याला बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्याला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयाने याची माहिती वांद्रे पोलिसांना दिली. काहीच वेळात वांद्रे पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी मोहम्मदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. त्या अहवालानंतर पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात गुन्हा नोंद केला आहे.