गोलंदाज झालो याची मला कायम खंत असेल! आर अश्विनचा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा नंबर 1 कसोटी फिरकीपटू आर अश्विनने अलीकडेच एक मोठा खुलासा करत आपली खंत व्यक्त केली आहे. “मी गोलंदाज झालो याची मला निवूत्तीनंतर कायम खंत असेल” असे मत आर अश्विन याने व्यक्त केले आहे. 2010 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या ऑफस्पिनर अश्विनने आतापर्यंत 92 कसोटी, 113 वनडे आणि 65 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने अनुक्रमे 474, 151 आणि 72 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला फलंदाज म्हणून सुरुवात केली होती, मात्र नंतर त्याने चेंडू हातात घेत गोलंदाजी सुरु केली. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या प्रवासाविषयी सांगितले आहे.

अश्विनने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांना वेगळी वागणूक दिली जाते. एके दिवशी मी हिंदुस्थान-श्रीलंका सामना पाहत होतो, त्यावेळी आपली गोलंदाजी कोलमडली होती. माझा आवडता फलंदाज सचिन तेंडुलकर होता आणि त्याने कितीही धावा केल्या, तरी त्या धावा आम्ही बॉलमधून गमवायचो. एके दिवशी मला वाटले की मी देखील गोलंदाज व्हावे. मी सध्याच्या गोलंदाजांपेक्षा सरस होऊ शकत नाही का? असे मला वाटले आणि म्हणूनच मी ऑफ-स्पिन गोलंदाजी करायला सुरुवात केली. इथूनच माझ्या गोलंदाजीची सुरुवात झाली. मात्र, उद्या जेव्हा मी निवृत्त होईल, तेव्हा मला पहिल्यांदा खंत वाटेल की, मी इतका चांगला फलंदाज होतो, मी कधीच गोलंदाज बनतो तर बरं झालं असतं.

आर अश्विनने म्हटले की, ‘फलंदाज आणि गोलंदाजासोबत समानतेने वागले पाहिजे कारण मला असे वाटते की दिवसाच्या शेवटी तुम्ही तुमची लोकप्रियता मिळवता हे महत्वाचे आहे. माझ्या कारकिर्दीतील चढ-उतारांमुळे मी लोकप्रियता मिळवली आहे.’