
>>दिलीप जोशी
दुर्मीळ ध्वनिमुद्रणे ऐकताना ‘एसएम’चं ध्वनिमुद्रण केलेल्या पासेटच्या दुसऱया बाजूला ‘ताराबाई जोशी यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणी’ वाचल्यावर सारी कात्रणं शोधून काढली. ताराबाईसारख्या सामान्य गृहिणी पतीसोबत उभ्या राहिल्या, लढल्या आणि जिंकल्या. त्या ‘एसेम’ पत्नी ताराबाईंविषयी…
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विविध विचारांच्या अनेक दांपत्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. गोदावरी आणि शामराव परुळेकर, मृणाल आणि बंडू गोरे, प्रमिला आणि मधू दंडवते, उषाताई आणि का. डांगे, रोझा आणि बानी देशपांडे, सुचेता आणि आचार्य कृपलानी (उत्तर प्रदेश), नंदिनी आणि देवेंद्र सप्तथी (ओडिशा), फिरोझ आणि इंदिरा गांधी, कमला आणि जवाहरलाल नेहरू… एवढंच काय, गांधीजींना 1942 मध्ये अटक झाल्यावर वृद्ध कस्तुरबा सभा घेण्यासाठी मैदानात उतरल्या होत्या. अशी कितीतरी उदाहरणं असतील. मात्र पतीच्या राजकीय प्रवासाच्या धकाधकीत घर सांभाळून सामान्य जीवन जगण्याचं आणि कार्यकर्त्यांची मायेने विचारपूस करायची असं पूरक कार्यही अनेक महिलांनी केलं. त्यापैकी अनेकींचे अनुभव पुढे दूरदर्शन आणि व्हिडीओ रेकार्डिंग सोपे झाल्याने संग्रहित झाले, परंतु चाळिसेक वर्षांपूर्वीची अशी ध्वनिमुद्रित नोंद क्वचितच असेल. मी एस. एम. जोशी (एसेम) यांच्याशी बोलत असताना ताराबाई शांतपणे ऐकत होत्या. त्या म्हणाल्या, “आधी अण्णांचं बोलणं पूर्ण होऊ दे. मग मी माझे अनुभव सांगते.” मग त्या एसेमना म्हणाल्या, “आधी माझे बोलणे होऊ दे. मग काय ती दुरुस्ती सुचवा!”
‘एसेम’चं राजकारण समाजवादी विचारांचं. त्यामुळे सत्तेपासून सतत दूर आणि सारखा संघर्ष. अगदी रस्त्यावरच्या संघर्षातही एस.एम. जोशी अग्रभागी असत. अण्णांचं हे सगळं राजकारण जवळून पाहणाऱया ताराबाईंनी शिक्षिकेची नोकरी करून घर सांभाळलं. या दांपत्याचा एक मुलगा डाक्टर झाला तर एक पायलट. त्यांच्या पुण्यातल्या छोटय़ाशा घरात दिवसभर चर्चा चालायच्या. मोठमोठे नेते यायचे. सामान्य कार्यकर्त्यांचा तर सतत वावर असायचा. ताराबाई ओघवत्या भाषेत सांगू लागल्या…
“त्यावेळची संयुक्त महाराष्ट्र परिषद पुढे चालणार नाही आणि ते नावही वापरता येणार नाही, असं काँग्रेसचे शंकरराव देव यांनी स्पष्ट केल्यावर महाराष्ट्राच्या लढय़ासाठी पुढचे पाऊल कोणते असावे यावर विचार करण्यासाठी जी बैठक टिळक स्मारक मंदिरात (पुण्याला) झाली, तिथे मी हजर होते. त्यावेळचं अण्णांनी केलेलं आवाहन पक्कं लक्षात राहिलं… ‘सगळे पक्षभेद विसरा, हा पक्षीय नव्हे तर मराठी जनतेचा लढा आहे. तो सफल होण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत.’ या त्यांच्या भाषणाने सर्वपक्षीय लोक आमच्याकडे येऊ लागले. सकाळपासून लोकांची रीघ लागलेली असायची. आमची मुलं त्यावेळी शिक्षणासाठी बाहेर होती. त्यामुळे घर सांभाळण्याची जबाबदारी (अण्णा सतत सभांसाठी बाहेर असल्याने) माझ्याकडे आली. या प्रकारे मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाकडे आकर्षित झाले.
ही चळवळ ऐन भरात आली तेव्हा पुण्यात काँग्रेसच्या बाबुराव सणस यांच्याविरुद्ध समितीतर्फे ‘एसेम’चं नाव पुढे आलं. त्यांची आधीची जागा जयंतराव टिळकांकडे गेली (ते त्यावेळी हिंदू महासभेत होते). अण्णा म्हणाले, ‘मी सेक्रेटरी असल्याने सगळीकडे फिरावं लागेल तेव्हा इतरांना निवडणूक लढवू दे.’ त्यानंतर मात्र शुक्रवार पेठेतल्या जागेवर लढत द्यायला कोणी तयार होईना तेव्हा एसेम म्हणाले, ‘आता या जागेवर मलाच लढावं लागेल.’ मला त्यावेळी राग आला. मी आचार्य अत्रे यांना पत्रही लिहिलं की, ‘तुम्ही सणसांविरुद्ध लढणार होतात त्याचं काय झालं?’ अण्णा मात्र समजुतीने म्हणाले, ’यावरून वाद नको.”
इथे मध्येच एसेम म्हणाले की, “सणस काँग्रेसचे असले तरी आमची व्यक्तिगत मैत्री होती. मी (एसेम) सदाशिव पेठेतून लढणार हे ठरल्यामुळे ‘मी शुक्रवारातून लढतो’ असं सणसांनी मला सांगितलं होतं, पण आम्हीच आयत्या वेळी मतदारसंघ बदलला?”
ताराबाई सांगत होत्या, “हो, अण्णांचा स्वभावच असा आहे. मुंबईतही जागा वाटपावरून मतभेद होऊ लागल्यावर त्यांनी बजावलं की, असं करून समिती मोडायची आहे का?” तेव्हा सगळय़ांनी ऐकलं. अण्णांच्या भाषणातली अनेक वाक्यं मला आठवतात. ते म्हणत, “हा लढा कुणा इतर भाषिकांविरुद्धचा नव्हे, तर आमच्या मराठी अस्मितेचा आहे. हे राज्य मराठी भाषिक झालं तरच सरकार तळागाळापर्यंत पोहोचेल. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत त्यांच्या सभांसाठी लोक गर्दी करायचे. एका भाषणाच्या वेळी कुणीतरी सुरा घेऊन धावून आला. कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं म्हणून अण्णा वाचले (मुंबईत आडवाणी नावाच्या पोलीस अधिकाऱयाला वाचवताना असाच जिवावरचा प्रसंग होता. एकदा कोणीतरी लोखंडी राडने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण वार हुकला). या काळात मी घरी एकटीच असायचे, पण वैचारिक मतभेद असूनही काँग्रेसचे बाबासाहेब घोरपडे, ‘तुम्ही केव्हाही बोलवलंत तरी मदतीसाठी येईन,’ असा वडीलकीच्या नात्याने धीर द्यायचे.
ही अटीतटीची निवडणूक बहुतेक सणस जिंकणार आणि अण्णांचा पराभव होणार या कल्पनेने रडू यायचं. निकालाच्या दिवशी गप्पच होते. लेखिका मालतीबाई बेडकर यांचा पहिला फोन आला आणि त्यांनी अण्णा जिंकल्याचं सांगितलं. अण्णांचं नेतृत्व जनतेने मानलं होतं. प्रतापगडावरील आंदोलन अण्णांनी शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी केलं. आचार्य अत्रे यांनी त्यांचं खूप अभिनंदन केलं. मी सामान्य कार्यकर्ती. त्यामुळे मी सत्काराला वगैरे जात नसे. तरी अत्रे यांनी भेटवस्तू पाठवून माझ्याही कार्याचं कौतुक केलं होतं.”
…सामान्य गृहिणींसारख्या अशा अनेक असामान्य महिला त्या काळात लढल्या आणि जिंकल्या! [email protected]





























































