
आयसीसी वन डे क्रिकेट वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत झिम्बाब्वेने नेपाळचा सहज पराभव करत आपले आव्हान जिवंत ठेवले. नेपाळने कुशल भुरटेलच्या 99 आणि आसीफ शेखच्या 66 धावांच्या जोरावर 8 बाद 290 अशी आव्हानात्मक मजल मारली होती. पण झिम्बाब्वेचा कर्णधार व्रेग एरव्हीन आणि सीन विल्यम्सच्या नाबाद शतकी खेळींच्या जोरावर त्यांनी नेपाळचा 8 विकेट आणि 35 चेंडू राखून सहज विजय मिळविला. एरव्हीन- विल्यम्सने तिसऱया विकेटसाठी 164 धावांची अभेद्य भागी रचली. एरव्हीनने 121 तर सीन विल्यम्सने 70 चेंडूंत 13 चौकार आणि 1 षटकार खेचला.
विंडीजचा विजय
गजानंद सिंगच्या झुंजार शतकानंतरही अमेरिकेला वेस्ट इंडीजविरुद्ध 39 धावांनी पराभव पत्करावा लागला. विंडीजने जॉन्सन चार्ल्स (66), शाय होप (54), रॉस्टन चेस (55), जेसन होल्डर (56) आणि निकोलस पूरन (43) यांच्या दणकेबाज खेळींमुळे 49.3 षटकांत सर्वबाद 297 अशी मजल मारली होती. पण या धावांचा पाठलाग करताना 4 बाद 55 अशी बिकट अवस्था असताना गजानंद सिंगने झुंजार फलंदाजी करत अमेरिकेच्या विजयासाठी प्रयत्न केले, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. विशेष म्हणजे गजानंदने नॉस्तुश केनजिगेबरोबर 76 धावांची नाबाद भागी केली.

























































