जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा थरारक विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वन डे आणि टी-20 क्रिकेटलाही लाजवेल असा थरार आक्रमकवृत्तीच्या (बॅझबॉल) खेळामुळे एजबॅस्टनवर अवघ्या जगाने अनुभवला. कर्णधार पॅट कमिन्सने 44 धावांची झुंजार आणि संयमी खेळी करताना नॅथन लायनबरोबर नवव्या विकेटसाठी 55 धावांची अभेद्य भागी रचत ‘अॅशेस’ मालिकेतील पहिली कसोटी 2 विकेट्सने जिंकली आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

क्षणाक्षणाला हृदयाचे ठोके चुकवणाऱया या कसोटीत इंग्लंडच्या 281 धावांचा पाठलाग करताना जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाची 8 बाद 227 अशी अवस्था करून इंग्लंडने कसोटीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पण पॅट कमिन्सने लायनच्या साथीने चित्तथरारक खेळ करीत इंग्लंडला नमविण्याची किमया साधली.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (प.डाव) – 8 बाद 393 (घोषित)
ऑस्ट्रेलिया (प.डाव) – सर्वबाद 386
इंग्लंड (दु.डाव) – सर्वबाद 273
ऑस्ट्रेलिया (दु. डाव) – 8 बाद 282 (ख्वाजा 65, वॉर्नर 36, ग्रीन 28, कमिन्स ना. 44, लायन ना. 16 ; ब्रॉड 64/3).

बॅझबॉल वृत्तीची वर्षभर धमाल
इंग्लंडने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून ‘बॅझबाल’ वृत्ती अंगीकारली. त्यांच्या आक्रमक खेळामुळे त्यांनी ती मालिका 3-0 ने जिंकली. मग दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने नमवले. पाकिस्तानचा 3-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध जिंकणारी मालिका एका धावेने हरल्यामुळे 1-1 अशी बरोबरीत सुटली. गेल्या वर्षभरात त्यांनी 14 पैकी 11 सामने जिंकले, तर केवळ 3 सामन्यांत हरले. एकही सामना अनिर्णितावस्थेत सुटला नाही, हे विशेष.