
>> शिवानी दिनेश गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
‘हायलाइटर’शिवाय मेकअप किट अपूर्णच असतो असा सध्याचा ट्रेंड झाला आहे.
हायलाइटर हा कॉस्मेटिक प्रॉडक्टचा एक प्रकार आहे. यामुळे लाइट रिफ्लेक्ट होते. तसेच हायलाइटर वापरल्यामुळे चेहऱ्याला एक डेप्थ मिळते व चेहऱ्याचे अँगल्स जास्त प्रकर्षाने लक्षात येतात. चेहऱ्याच्या काही महत्त्वाच्या भागांवर हायलाइटरचा वापर केल्यामुळे त्या त्या भागाचा आकर्षकपणा वाढून एकंदरीतच चेहरा जास्त आकर्षक दिसतो. त्यामुळेच मेकअप आर्टिस्टचा व मेकअप करणाऱ्यांचा कल हायलाइटरकडे झुकलेला दिसतो.
विविध प्रकारचे आणि रंगाचे हायलाइटर बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या त्वचेच्या रंगाप्रमाणे तुम्ही हायलाइटरचा वापर करू शकता. हायलाइटरचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येतो. चेहरा चमकदार दिसतो. त्यामध्ये लिक्विड हायलाइटर, स्टिक हायलाइटर, पावडर हायलाइटर, लुज पावडर हायलाइटर असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. हे हायलाइटर तुम्ही ब्लेंडरने, ब्रशने, फॅन ब्रशने, काबुकी ब्रश अशा वेगवेगळय़ा प्रकारे लावू शकता, तर बोटांचा वापर करूनही तुम्ही हायलाइटर लावू शकता. लिक्विड हायलाइटरमध्ये असलेल्या कांडीने तुम्ही हायलाइटर लावून घेऊन नंतर तो हलकाच ब्लेंडरने किंवा ब्रशने स्मज करू शकता. तसेच पावडरमध्ये असलेला हायलाइटर तुम्ही ब्रशने लावू शकता.
त्वचेप्रमाणे करा निवड
वेगवेगळय़ा स्किन टोनप्रमाणे हायलाइटरचा वापर करताना तुम्ही फेअर स्किनसाठी जर हायलाइटर वापरणार असाल तर लाइट पिंक, लाइट पर्पल, पिंक डायमंड किंवा लाइट आयवरी रंगांचा वापर करू शकता. फेअर टू मीडियम स्किनसाठी डार्क आयवरी, गोल्डन किंवा ब्रांझ या रंगांचा हायलाइटर वापरू शकता, तर डार्क सावळय़ा रंगासाठी तुम्ही हायलाइटरच्या डार्क शेड वापराव्यात. डार्क कॉपर किंवा गोल्डन ब्राऊन शेडस् तुम्ही वापरू शकता.
– तुमची त्वचा जर ऑयली किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल तर मात्र तुम्ही लिक्विड किंवा क्रिमी हायलाइटरचा वापर करू नका. त्यापेक्षा तुम्ही पावडर हायलाइटरचा वापर करा. हायलाइटरचा वापर तुम्ही तुमच्या फाऊंडेशनमध्येही करू शकता. मात्र त्याचे प्रमाण योग्य प्रकारे वापरले गेले पाहिजे.
– हायलाइटरमुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते व आपल्या चेहऱ्याचे फिचर्स हायलाइट होतात. तसेच बारीक चेहऱ्याला थोडे मोठे दाखवण्यासाठी किंवा मोठय़ा चेहऱ्याला बारीक दाखवण्यासाठीही हायलाइटरचा वापर केला जातो.
– हायलाइटर सगळय़ा चेहऱ्यावर लावू नये. तसे केल्याने तुमचा संपूर्ण चेहरा मेटॉलिक वाटेल. हाइलाइटरचा वापर फक्त काही महत्त्वाच्या ठिकाणीच केलात तर तुमचा चेहरा आकर्षक दिसून एकंदरीतच तुमचा मेकअपचा लुक आकर्षणाचा विषय ठरेल.
– हायलाइटरचा वापर तुम्ही कपाळाच्या मधल्या भागावरदेखील करू शकता, त्यामुळे तुमच्या कपाळावर एक प्रकारची चमक येऊन एकंदरीतच तुमचा चेहरा आकर्षक दिसेल.
– नाकावर हायलाइटरचा वापर करताना नाकाच्या मधल्या भागावर तुम्ही हायलाइटर लावून तो हलकाच स्मज केला तर नाक जास्त आकर्षक आणि टोकदार व सरळ भासेल.
– ओठांना आकर्षक करण्यासाठी ओठांच्या वरच्या भागावर मध्यावर तुम्ही हायलाइटर लावू शकता. हनुवटीच्या मधल्या भागावर तुम्ही हलके हायलाइटर लावल्यास हनुवटी सुंदर भासू लागेल.
– हायलाइटरमुळे डोळय़ांना शिमरी लुक मिळतो आणि त्यामुळे तुमचे डोळे सुंदर दिसतात. तसेच कन्सिलरमध्ये थोडासा हायलाइटर मिक्स करून स्पंजच्या सहाय्याने तुम्ही डोळय़ांखाली लावल्यास डोळे हायलाइट होऊन चमक येईल.
























































