
कापड उत्पादनाचा खर्च निघत नसल्याने तसेच कारखाने तोटय़ात चालत असल्यामुळे शुक्रवार व सोमवार असे दोन दिवस रॅपिअर कारखाने बंद राहणार आहेत. असा निर्णय दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनकडून घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी येत्या शुक्रवार (दि.30) पासून होणार आहे.
रॅपिअर कारखानदारांची व्यवसायासंदर्भात चर्चा करण्यासाठी इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनची सभा झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. यावेळी रॅपिअर कारखानदारांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या काही महिन्यांपासून सतत मंदी असल्याने कापड उत्पादनास येणारा खर्च व मिळणारी मजुरी यात मोठी तफावत आहे. कापड उत्पादनास येणारा खर्चही मिळत नाही. नुकसानीत व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होईपर्यंतच्या काळात शुक्रवारपासून (दि. 30) शुक्रवार व सोमवार असे दोन दिवस म्हणजे आठवडय़ात 48 तास कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुताचा दर कमी होत असल्याने मुंबई, सुरत, अहमदाबाद, दिल्ली येथील व्यापाऱयांनी कापड खरेदी तात्पुरती कमी केली आहे. सध्या कारखाने बंद ठेवावे लागले तरी चालेल; पण कमी मजुरीत व नुकसानीत कारखाने चालवायचे नाहीत, असा निर्णय रॅपियर कारखानदारांनी घेतला. 15 दिवसांनी फेर आढावा घेऊन निर्णय घेण्याचे ठरले. यावेळी उपाध्यक्ष रफिक खानापूरे, सतीश कोष्टी, सुकुमार देवमोरे, शीतलकुमार पाटील, कृष्णात कुंभोजे, अतुल शेळके, कृष्णात सातपुते, शिवानंद जोतावरसह अनेक कारखानदार हजर होते.

























































