मुंबई मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या 2 लाखांच्या पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मेट्रोने प्रवासी संख्येचा एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्येनं 2 लाखांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या आहे. पावसाळ्यातही न थांबता धावणाऱ्या मेट्रोमार्ग 2अ आणि मेट्रो मार्ग 7 वर मंगळवारी 2 लाख, 3 हजार, 581 मुंबईकरांनी प्रवास केला.

मेट्रोमार्ग 2अ आणि मेट्रो मार्ग 7 कार्यरत झाल्यापासून नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोची सर्वाधिक दैनंदिन संख्याही नवा उच्चांक गाठत आहे. मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा सुरु झाल्यानंतर म्हणजेच 2 एप्रिल 2022 ते 27 जून 2023 पर्यंत मेट्रो प्रवासी संख्या 3, 33, 81, 920 इतकी आहे, तर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करताच मुंबई मेट्रोचं पहिलं जाळं या शहराला मिळालं आणि त्यानंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. 20 जानेवारी ते 27 जून 2023 या 5 महिन्यांच्या कालावधीत 2, 44, 16, 775 प्रवाशांनी मुंबई मेट्रोनं प्रवास केला.

मुंबईकरांना अतिवृष्टीमुळे त्रास होणार नाही नाही याची काळजीही मुंबई मेट्रोनं घेतली आहे. मुंबई मेट्रो मुसळधार पावसातही विना व्यत्यय आपली सेवा सुरु राहिल याची सर्वतोपरी काळजी आधीच घेण्यत आली आहे. नागरिकांसाठी महा मुंबई मेट्रोने मान्सून कंट्रोलरूम देखील सुरु केली आहे. प्रत्येक मेट्रो स्थानकावर 64 कॅमेरा प्रत्येक घटनेची नोंद घेत आहे. विनाव्यत्यय किंवा सीमलेस प्रवासासाठी सुरु करण्यात आलेल्या मुंबई- 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधेला देखील नागरिकांनी पसंती दिली आहे . आतापर्यंत जवळपास 1,14,171 प्रवाशांनी मुंबई वन कार्डाचा लाभ घेतला आहे.

“प्रदूषण विरहित, सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या मेट्रोला मुंबईकरांनी नेहमीच पसंती दिली, त्याबद्दल मुंबईकरांचे आभार. महा मुंबई मेट्रोही नागरिकांच्या सेवेसाठी कायम तत्पर आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या हि आता 2 लाखांच्या पार गेली आहे आणि आम्हला विश्वास आहे की मुंबईकरांच्या अशाच उदंड प्रतिसादामुळे आम्ही असेच अनेक महत्त्वाचे टप्पे (माईलस्टोन) गाठत राहू. टप्पा 2च्या लोकार्पणानंतर दर महिन्याला प्रवासी संख्येत सरासरी 5 % वाढ होत आहे.पावसाळ्यातही मुंबई मेट्रो सेवा अशीच अविरत सुरु राहील याकडे सातत्याने आमचं लक्ष आहे. जर अतिवृष्टीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली तर अतिरिक्त मेट्रो चालवण्याची तयीरीही महा मुंबई मेट्रोनं ठेवली आहे.” असं महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच महानगर आयुक्त, एमएमआरडीए डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे म्हणाले