अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या सेशनला मैदानावर गोंधळ, आंदोलनकर्त्यांनी खेळाडूंवर रंग फेकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. सामना सुरू झाल्यानंतर लॉर्ड्सवर काही आंदोलनकर्त्यांनी गोंधळ माजवला. त्यामुळे काही काळ सामन्यात व्यत्ययही आला.

क्रिकेटची पंढरी अशी ख्याती असलेल्या लॉर्ड्स मैदानावर ही मालिका खेळवली जात आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. जसा हा सामना सुरू झाला, तसं जस्ट स्टॉप आईल ग्रुपच्या काही आंदोलनकर्त्यांनी थेट मैदानावर धाव घेतली. त्यांच्याकडे नारिंगी रंगाची पूड होती, ती त्यांनी खेळाडूंवर उडवायला सुरुवात केली.

हा प्रकार पाहून खेळाडू आंदोलनकर्त्यांपासून लांब झाले. दरम्यान, मैदानाचे सुरक्षा कर्मचारी तिथे आले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली. दरम्यान, इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टो याने एका आंदोलनकर्त्याला चक्क उचलून घेतलं आणि मैदानाच्या बाहेरची वाट धरली. या आंदोलनकर्त्याकडेही ती पूड होती. त्याने ती बेअरस्टोवर फेकली. बेअरस्टोचे कपडे त्यामुळे खराब झाले. ते कपडे बदलून बेअरस्टो पुन्हा मैदानावर आला. तोपर्यंत सामना खोळंबून राहिला होता.

या दरम्यान, सुरक्षा रक्षकांसह डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हे दोघे आंदोलनकर्त्यांना पिच खराब करण्यापासून रोखत होते. अखेर त्या सगळ्यांना मैदानाबाहेर काढल्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला.

जस्ट स्टॉप आईल ग्रुप ही एक पर्यावरण कार्यकर्ती संघटना आहे. ब्रिटीश सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या नवीन तेल परवान्याला रोखण्याचा त्यांचा उद्देश आहे. या संघटनेची स्थापना 2022च्या फेब्रुवारीत करण्यात आली आणि त्यांनी दोनच महिन्यात तेल पुरवठादार स्थळांबाहेर प्रदर्शन सुरू केलं होतं.