
पाऊस येतो आणि पृथ्वीचा हिरवागार स्वर्ग होतो. या स्वर्गातील अमृततुल्य पेय म्हणजे चहा. चहाच्या चाहत्यांना ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचं बंधन नाही. ‘चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतो’ वगैरे वाक्यं तर एव्हाना आपल्याला तोंडपाठ झाली असतात, पण पाऊस आणि चहा म्हणजे दुग्धशर्करा, मणिकांचन किंवा अगदी साध्या भाषेत बोलायचं तर जय-वीरूची जोडी आहे. त्या चहाची ही अमृततुल्य गोष्ट.
चहाचा शोध अपघाताने लागला. चीनमध्ये शेनॉंग राजाचं राज्य होतं. हे राजे औषधी वनस्पतींचे तज्ञ होते. एकदा आपल्या उद्यानात ते विहार करत असताना वाऱयाच्या मंद झुळकीने काही पानं ते पीत असलेल्या गरम पाण्यात येऊन पडली. पाण्याचा रंग बदलला आणि त्या गंधाने शेनॉंग महाराजांना तरतरीत वाटलं. त्यांच्यातील वनस्पती तज्ञाला अर्थातच याचं कुतूहल वाटलं आणि त्यांनी त्या पानांचा अभ्यास केला. सुरुवातीला विषारी पानामुळांवर उतारा म्हणून चहाची पानं चावून खाल्ली जात. नंतर या वनस्पतीचे औषधी गुण लक्षात आल्यावर ही पानं आजारात ऊर्जा देण्यासाठी, तरतरी येण्यासाठी उकळून प्यायला सुरुवात झाली. पुढे या औषधी वनस्पतीचं महत्त्व वाढत गेलं आणि चहा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला.
चहा किंवा इंग्रजी ‘टी’ हे नाव या वनस्पतीला कसं मिळालं? चिनी भाषेत कडू वनस्पतींकरिता ‘ते’ किंवा ‘टे’ हा शब्द आहे. त्याच ‘टे’चं ‘टी’ झालं, तर जपानी व कोरियन भाषेत यासाठी ‘चा’ हा शब्द असल्याने हिंदुस्थानी भाषेत त्याचं ‘चहा’, ‘चाय’ असं रूपांतर झालं.
आजही अनेक घरांमध्ये दूध नसणारा कोरा चहा, फुटी चाय पितात. मग चहात दूध कधी आलं? अनेक जण याचं श्रेय ब्रिटिशांना देतात, पण तसं नाहीय. चीनमधून व्हाया मंगोलिया चहा तिबेटमध्ये गेला तेव्हा तिथे चहात दूध वापरल्याचा पहिला उल्लेख होतो.
जगातील दुसऱया क्रमांकाचे लोकप्रिय पेय असणारा चहा जगात सर्वत्र उपलब्ध होतो. तो कसा बनवावा याचं प्रत्येक देशात वेगळं शास्त्र आहे. जसं की, चीनमध्ये चहासाठी वापरलं जाणारं पाणी सर्वात महत्त्वाचं. म्हणजे ते नदीचं की तलावाचं यावरूनही चव बदलते. मोरोक्कोत मिंट किंवा टुअरग टी सुका मेवा अथवा गोड पदार्थासह देणे हा आदरातिथ्याचा भाग आहे. ब्रिटिशांचा ‘आफ्टरनून टी’ म्हणजे ब्रिटनच्या राणी किंवा राजाइतकाच शाही मामला! तिबेटमधल्या कडाक्याच्या थंडीत बटर टी पिण्याची परंपरा बाकीच्या जगाला विचित्र वाटली तरी तिबेटियन मंडळींसाठी खासच! इराणी मंडळी चहात साखर घालण्यावर विश्वास ठेवत नाहीत. इथे चक्क शुगर क्युब दातात धरून वर चहा प्यायची पद्धत आहे. चहाच्या उत्पादनात आपल्या देशाचा जगात अव्वल क्रमांक आहे हे इथल्या जागोजागी दिसणाऱया चहाच्या टपऱयांच्या संख्येवरून वेगळं सांगायची गरज उरत नाही, पण त्यातही मसाला, अद्रकवाली, इलायची, गवती चहा, गुळाचा, नागौरी, टमटम, पंढरपुरी हे आणि याहून भरपूर वैविध्य दिसते. तंदूर टी, बबल टी, बिर्यानी चहा, बासुंदी चहा, चॉकलेट चहा हे नवे फॅन्सी चहा प्रकारही आवडीने प्यायले जातात.
चकचकीत टी हाऊस असो किंवा साधी टपरी, हिंदुस्थानी माणसासाठी चहा म्हणजे जिव्हाळ्याचा मामला आहे. पावसाने रान आणि मनं हिरवीगार झाली असताना, सगळीकडे कुंद हवा असताना, मित्रांचं-कुटुंबीयांचं कोंडाळं किंवा खास आपलं माणूस किंवा आपुलीच साथ करणारं एकटेपण असताना कानावर रुहानी संगीताचे स्वर आणि हातात वाफाळता चहा असावा. आयुष्य ‘अमृततुल्य’ करण्याची ताकद या क्षणात असते…चहाचे गरमागरम घोट घशाखाली उतरत जातात. पावसाळी ढग दाटून राहतात आणि ‘चहा’मय जग ‘चहा’त्यांचा मेळा बनून राहतं.
>> रश्मी वारंग































































