
मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत झाड अंगावर कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मालाड, गोरेगावच्या घटनेनंतर आज भायखळय़ात वडाचे जुने झाड अंगावर कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. झाड अंगावर कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जूनमध्ये आतापर्यंत मुंबईत 434 तक्रारी आल्या आहेत. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत.
भायखळा पूर्व इंदू ऑईल मिल कंपाऊंड येथील 50 वर्षे जुने कडाचे झाड बुधवारी मध्यरात्री रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास झोपडीवर कोसळले. यावेळी झोपडीत असणारे सहाही जण जखमी झाले. या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यातील गंभीर जखमी रेहमान खान (20) याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. जखमींमधील सर्वजण कामगार असल्याचे समजते. हे सर्वजण वडाच्या झाडाजवळील झोपडीत राहत होते. या दुर्घटनेतील इतरांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, पालिकेने नागरिकांना पावसाच्या वेळी झाडांखाली थांबू नका, असा सावधगिरीचा इशारा दिला आहे.
तीन वर्षांची स्थिती
– जून 2021 मध्ये संपूर्ण मुंबईत एकूण 2588 ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या. यामध्ये 24 जण जखमी झाले होते, तर पाच जणांचा मृत्यू झाला होता.
– जून 2022 मध्ये मुंबईत एकूण 1374 ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये 28 जण जखमी झाले. मात्र एकही मृत्यू झाला नाही.
– 28 जून 2023पर्यंत मुंबईत एकूण झाड-फांद्या कोसळल्याच्या 434 तक्रारी आल्या असून मागील आठवडय़ात पाऊस सुरू झाल्यापासून सहा दिवसांत तिघांचा मृत्यू झाला आहे.
’झाडांचा डॉक्टर’ उपक्रम चार वर्षे रखडला
चेंबूरमध्ये चार वर्षांपूर्वी माडाचे झाड अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पालिकेत नगरसेवकांनी धोकादायक झाडांबाबत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी प्रशासनाने ‘झाडांचा डॉक्टर’ संकल्पनेवर ‘ऍर्बोरिस्ट’ची नेमणूक करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या वनस्पतीतज्ञांकडून झाडांची पाहणी करणे अपेक्षित होते, जेणेकरून धोकादायक फांद्या, झाडे हटवणे शक्य होणार होते. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे माजी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे रवी राजा यांनी सांगितले. सुशोभीकरणावर पालिका कोटय़वधींचा खर्च करीत असताना पालिकेला मुंबईकरांच्या जिवाची पर्वा नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कांदिवलीत घर कोसळून एक ठार
कांदिवली पूर्व बाणडोंगरीजवळ घर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किसन धुल्ला (35) असे या मृताचे नाव आहे. बाणडोंगरीत बोनान्झा इंडस्ट्रीजवळ तेलगू समाज सोसायटीत 9.33 मिनिटांनी ही घटना घडली. यामध्ये जखमी युवकावर बाथरूमचा स्लॅब पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता रुग्णालयात आणण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.





























































