
>>डॉ. अनिल कुलकर्णी
केवळ पुस्तकं वाचून अव्यक्त राहणाऱया पिढीला पुस्तकांच्या पलीकडे गेलं तरच व्यक्त होण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मुलांना केवळ पोपटासारखं बोलायला शिकवण्यापेक्षा व्यक्त होणं शिकवायला हवं. बालकवींची कविता ‘हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ कविता पाठ करून मुले अव्यक्त राहतात. पण प्रत्यक्षात जेव्हा हिरव्या गालिचावरून ती चालतात, उडय़ा मारतात तेव्हा ती जास्त व्यक्त होतात आणि आनंदाच्या जवळ पोहोचतात. अव्यक्त राहण्यात मने झाकोळतात. व्यक्त होणे म्हणजे ‘झाले मोकळे आकाश’ ही भावना मनात येणे. संवाद नसलेल्या समाजात व्यक्त होणं आवश्यक आहे. वेळच्या वेळी व्यक्त झाले की, अनेक प्रश्न सुटतात.
माणसांची तार जुळायची त्याच्याशीच जुळते. या तार जुळण्याला काहीच तार्किकता नाही. व्यक्त होण्यात उद्ध्वस्त होण्याची भीती असते म्हणूनही माणसे व्यक्त होत नाहीत. माणसे जेवढी देवाजवळ व्यक्त होतात तेवढी प्रेयसीजवळ व्यक्त होत नाहीत. कारण देवाजवळ ाढा@स चेकिंग नसते. माणसांच्या व्यक्त होण्यात स्वार्थही असतो, तसा फुलांच्या व्यक्त होण्यात नसतो. फूल देवासाठीही व्यक्त होतं, स्त्राrच्या सौंदर्यवृद्धीसाठी व्यक्त होतं, मृत्युशय्येवरही आदराने नतमस्तक होतं. व्यक्त होण्यासाठी आपलं निर्माल्य होतं हे त्याला ठाऊक असतं तरी.
माणसांचे व्यक्त होणे म्हणजे त्याला फिक्स डिपॉझिट वाटतं. जिथे व्याज जास्त तिथेच आपण गुंतवणूक करते. मला काय मिळेल यातच त्यांचे जीवन व्यस्त असते. देवासमोर नवस बोलताना ही माणसे गुंतवणूक करतात. असं झालं तर तसं करेल. माणसे व्यक्त होऊ शकतात म्हणूनच आस्वाद घेऊ शकतात, परीक्षण करू शकतात, समीक्षा, टीका, चर्चा करू शकतात. तो त्यांचा एक बौद्धिक खुराकच आहे. प्राणी आणि वनस्पती यांच्या व्यक्त होण्याला मर्यादा आहेत आपल्या दृष्टीने, पण त्यांच्या दृष्टीने ते व्यक्त होतातच. प्राणी आणि वनस्पती निसर्गानुसार व्यक्त होतात, निसर्गाविरुद्ध नाही. माणसे निसर्गाविरुद्धही व्यक्त होतात. निसर्गाला उद्ध्वस्त करून विजय मिळवण्यात स्वतचा विनाश कधी करून घेतात हे त्यांच्याही लक्षात येत नाही.
आनंद, दुःख या माणसांच्या व्यक्त होण्याच्या जागा. भावनेच्या संपत्तीवरून माणसांचं व्यक्त होणं ठरतं. कोणी भावनाप्रधान तर कोणी निर्विकार, भावनाशून्य!
अनेक भावना लॉकरमध्ये असल्याप्रमाणे सुरक्षित तर असतात, पण उपयोगाच्या नसतात. त्या आहेत यातच समाधान. अनेक अव्यक्त भावनांनी लगडलेली माणसे अनेक अव्यक्त भावनांचे ओझे घेऊन जगतात. शेवटच्या श्वासापर्यंत माणसाजवळ एकच गोष्ट असते ती म्हणजे अव्यक्त भावना. प्रेम करायला व्यक्तच व्हायला पाहिजे असं नाही. अव्यक्त राहूनही अनेक गोष्टींवर अनेक जण प्रेम करतात. अनेक गोष्टींवर प्रेम करण्याची आपल्याला मुभा आहे, पण काही ठिकाणी ‘अटी लागू’ हे पाळावं लागतं.
व्यक्त, अव्यक्त होण्यातून संस्कृती कळते, विकृती कळते. व्यक्त होण्यात बंधन आहे. कोणी कसेही व्यक्त नाही होऊ शकत. अव्यक्त राहण्यात बंधन नाही. अव्यक्त राहून अनेक डाव साधता येतात. मनाचा थांगपत्ता लागू द्यायचा नसेल तर अव्यक्त सारखे साधन नाही. अव्यक्त प्रेम मुदतीची ठेव असते, आहे याचे समाधान. मनाच्या श्रीमंतीत अनेकांना स्थान असतं आणि ते असायलाही हवे. कुठे, काय, कसे किती व्यक्त व्हायचे याचे गणित जमले पाहिजे. व्यक्त होण्याचेही मापदंड ठरलेले असतात. माणसे व्यक्त होत नाहीत हीच आजची समस्या आहे.
पोखरलेल्या, उद्ध्वस्त व्यक्तिमत्त्वावर क्षणिक आनंदाचा इंद्रधनुही दाखवतात. “कसं चाललंय?” म्हटल्यावर मस्त उत्तर देऊन किती दिवस फसवणार. आपलं दुःख झाकून ठेवायची सवय लोकांना असते. काही जागा अशा असतात की, तिथेच फक्त दुःख व्यक्त करता येते. अशा जागा जेवढय़ा जास्त तेवढा माणूस श्रीमंत, पण विश्वासाने पाय धरावेत, विश्वास टाकावा अशा जागाच जेव्हा दुर्मीळ असतात तेव्हा व्यक्त होणे कठीण असते. श्रद्धा-अंधश्रद्धा यांना हातात घेऊनच देवाजवळ व्यक्त होता येतं. काही व्यक्त व्हायला कारणमीमांसा, तार्किकता खुंटीला टांगून ठेवावी लागते. एकाची श्रद्धा दुसऱयासाठी अंधश्रद्धा असू शकते.
माणसाच्या मृत्यूनंतर व्यक्त, अव्यक्तचा संघर्ष संपतो असे नाही. मृत्यूनंतर ही माणसे व्यक्त होतात विचारांनी, पुस्तकरूपाने व आपल्या आयुष्यात सदैव दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शक ठरतात. दीपस्तंभानेच मानवी जीवनाची ही नौका भरकटत नाही.





























































