
>>वैश्विक
हा लेख तुमच्या हाती येईपर्यंत जुलैचा पहिला आठवडा संपत आला असेल. यावर्षी जून अखेरपर्यंत पावसाने दडी मारली. 7 जून रोजी ‘मृग’ नक्षत्रावर पाऊसधारा बरसतात ही परंपरा गेल्या दशकात खंडित झालीय. याचं कारण बदलतं जागतिक हवामान. या ‘क्लायमेट चेंज’चा परिणाम पुढे आणखी काय काय सहन करावे लागणार ते कोणास ठाऊक! त्याविषयी नक्की काहीच सांगता येत नाही, पण निसर्गही रीत मोडून विपरीत वागू लागला आहे (कदाचित माणसासारखाच!) हेसुद्धा खरं.
आपल्या ‘आभाळमाया’त याचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे स्वतःच्या अक्षाशी साडेतेवीस अंशाचा कोन करणाऱया पृथ्वीमुळे पृथ्वीवर ऋतुचक्र तयार होतं. सूर्याचं भासमान दक्षिणायन आणि उत्तरायण जाणवतं. आता 21 जून रोजी दक्षिणायन सुरू झालं. म्हणजे सूर्य तसा 21 सप्टेंबरपर्यंत आपल्या देशाच्या आकाशात प्रखरतेने तळपणार आहे. मात्र त्यापैकी जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे असल्याने आपल्याला या उन्हाळय़ाची जाणीव होत नाही, परंतु सूर्यप्रकाश इतका तीव्र असतो की, पाऊस थांबून ढगाळ वातावरण असलं तरी उकाडा जाणवायला लागतो.
याचं कारण म्हणजे सूर्याच्या अंतर्भागात दीड कोटी अंश सेल्सियस (केल्विन) एवढय़ा प्रचंड उष्णतेची नैसर्गिक अणुभट्टी खदखदत असते. सूर्याच्या या गाभ्यातील हायड्रोजनचं हिलिगममध्ये रूपांतर करण्याचं काम फ्यूझन पद्धतीने अव्याहत सुरू असतं. त्यातून जे अब्जावधी फोटॉन तयार होतात तोच प्रकाश असतो. अस हे प्रकाशकण किरणांच्या स्वरूपात अडखळत, धडपडत 7 लाख किलोमीटर सौर-त्रिज्येचा भेद करून 10 लाख वर्षांनी सूर्याच्या पृष्ठभागापर्यंत पोचतात. तिथून पुढे मात्र ते सेपंदाला 3 लक्ष किलोमीटर वेगाने, निर्वात पोकळीतून 14 कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या पृथ्वीवर येतात. केवळ सवाआठ मिनिटांत त्यांचा हा प्रवास होत असतो.
आपण जेव्हा उन्हात जातो तेव्हा आपल्या जनक ताऱयाच्या गाभ्यातून निर्माण झालेल्या फोटॉन किंवा प्रकाशकणांचा थेट स्पर्श आपल्या त्वचेला जाणवतो आणि त्यातून पोषक असे ‘डी व्हिटॅमिन’ मिळते हे लक्षात ठेवलं तर खगोलाशी आपलं किती निकटचं नात आहे हे समजेल. विज्ञान शिकायचं असतं ते याचसाठी.
सूर्याच्या गाभ्यातलं तापमान प्रचंड असलं तरी त्याच्या पृष्ठभागावरचं तापमान त्या मानाने खूप कमी म्हणजे फक्त 6 हजार सेल्सियस एवढं असतं. त्यातही त्यावर जे काळे डाग (ब्लॅक स्पॉट्स) ठराविक काळाने दिसतात, त्यांचं तापमान त्याहून कमी म्हणजे 3 ते 4 हजार अंश सेल्सियस असतं. अर्थात आपल्यासाठी तेसुद्धा अतिच आहे. कारण चाळीस-बेचाळीस तापमानाला सर्वांगाची लाही लाही होते. गेल्या वर्षी तर थंड प्रदेश मानल्या गेलेल्या इंग्लंडमध्ये तापमान 40 अंशांवर गेलं आणि लोक नदीपात्रात, तलावात डुंबत राहिले. पॅनडामध्ये तर उष्णतेच्या लाटेने कहर केला. ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे असे फटके आता ‘तथाकथित’ प्रगत जगाला वारंवार बसणार आहेत.
सूर्याच्या प्रकाश तीव्रतेचे मोजमाप एका चौरस मीटरला 1380 वॅट्स इतकं तर एक फुटी मेणबत्तीच्या परिमाणाने 1000 मेणबत्त्या इतपं एका फुटासाठी असते. 1 फुटाच्या मेणबत्तीचा उजेड एका चौरस फुटापर्यंत पडतो तेव्हा त्याला ‘एफसी’ (एक फूट पॅन्डल लाइट) असं म्हटलं जातं. असे संशोधन पाश्चात्त्य देशांत झाल्याने त्यांनी पणती, समईची परिमाणं घेतलेली नाहीत. बल्बसुद्धा 40, 60 ‘पॉवर’चा असतो. म्हणजे तेवढय़ा ‘कॅन्डल-पॉवर’चा असतो. पाऊस सुरू झाला असेल तर दिवसा ढगातून येणारा प्रकाश आपल्याला सूर्य मावळेपर्यंत वावरण्यास मदत करतो. दिवसा खूपच ‘धो-धो’ पाऊस पडत असेल तर ट्रेन, कारचे लाइट लावावे लागतात किंवा आपणही टॉर्च वापरतो. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ अशी स्थिती असते. तेव्हा ढगांच्या घनतेनुसार सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी जास्त होते. एखादेवेळी, एकदम काळोखी येऊन रात्र झाल्यासारखा अनुभव येतो त्यावेळी सूर्यप्रकाश अतिशय क्षीण 500 कॅन्डल (एफसी) इतकाच होतो. एरवी तो प्रखर उन्हात 6000 ल्युमेन आणि दाट सावलीत 1000 ल्युमिनेन्स इतका असतो. आपल्याला 3500 ल्युमिनन्स तीव्रतेचं कोवळं, सकाळ-संध्याकाळचं ऊन सुसहय़, आल्हाददायक वाटतं.
सूर्यप्रकाशातून मिळणारं डी व्हिटॅमिन पावसाळय़ातही मिळू शकतं, पण कमी प्रमाणात. ढगाळ आकाशातून कधीतरी सूर्यबिंब चंद्रासारखं दिसलं तरी त्याकडे पाहू नये. कारण अचानक ढग दूर झाल्यास प्रखर सूर्यकिरणं डोळय़ांना कायमची इजा करू शकतात. आपल्या देशात जी नैसर्गिक समृद्धी आहे त्यामध्ये सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळेच समशीतोष्ण कटिबंधातील जैविक वैविध्य आपल्या देशात विपुल आहे. त्याचं रक्षण करायला हवं.
पावसातील दिवसाच्या उजेडाची ही कहाणी… पण आता चार महिने ‘आकाशदर्शन’ होणार नाही. ते नाही झाले तरी चालेल, पण पृथ्वी नावाच्या ग्रहावरील आपल्या देशात सूर्य नावाच्या ताऱयाच्या ‘कृपे’ने पडणारा पाऊस भरपूर होऊ दे! शेतकरी खुश होऊ दे! सर्वत्र आबादानी होऊ दे!


























































