
राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये सामावून घेतल्याबद्दल केवळ मिंधे गटातच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही धुसफूस आहे. पक्षासाठी आयुष्य वेचणाऱया भाजप आमदारांच्या मंत्रीपदाचे काय? असा जाहीर सवाल कार्यकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी फडणवीसांना यासंदर्भात पत्रे लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या कार्यालयात तर अशा पत्रांचा ढीग जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अजित पवार गटाला नऊ मंत्रीपदे दिल्याने भाजप आमदारांमधील नाराजी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पत्राद्वारे जाहीर केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी एक पत्र पाठवून या नाराजीला तोंड फोडले होते.
असंख्य पत्रे आता फडणवीसांच्या मेजावर फडफडत आहेत. अजित पवार व त्यांचे सहयोगी यांना सरकारमध्ये सामावून घेऊन राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली की भाजपची, असा थेट सवाल या पत्रांमध्ये विचारला आहे.






























































