
सहा जणांच्या टोळीविरुध्द पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी टोळी तयार करून सशस्त्र दरोड्याचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते. विशेष म्हणजे हे सर्व दरोडेखोर बाहेरील जिल्ह्यातील आहेत.
अंबेजोगाई रोड डी मार्ट जवळील असलेल्या अपार्टमेंट दिनांक 15 मे 2023 रोजी सशस्त्र दरोडेखोराने दरोडा टाकल्याची माहिती पेट्रोलिंग वरील पोलिसांना समजली होती. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखा आणि लातूर शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना काही तासातच मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले होते.
गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरच्या दरोडेखोरांनी लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी तसेच महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी टोळी तयार करून सशस्त्र दरोड्याचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते. दरोडा, जबरी चोरी सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली होती. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतःच्या आर्थिक लाभासाठी, संघटितपणे, वेगवेगळे साथीदार घेऊन टोळी निर्माण करून हिंसाचाराचा वापर व कट करून स्वतःचे व टोळीतील साथीदाराचे आर्थिक फायद्याकरिता सशस्त्र दरोड्याचे गुन्हे करणे, जीवे मारणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घातक हत्याराने दुखापत करून लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नमूद आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीविरूध्द मोक्का सारख्या कठोर कायद्याप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी सदरील दरोडेखोराविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 अन्वये कलम वाढ करण्याबाबत परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव पाठविलेला होता. संघटित गंभीर गुन्हे करणार्या गुन्हेगारांच्याविरूध्द मोक्का अंतर्गतची ही लातूर जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील दुसरी मोठी कारवाई आहे.
सदर गुन्ह्यातील महेश आसाराम चव्हाण रा. गेवराई, नितीन संजय काळे उर्फ बापू टांग्या काळे रा. नगर, विकास रामभाऊ भोसले रा. बीड, रवींद्र संजय काळे रा. नगर, लक्ष्मण पांडुरंग भोसले (30) रा. उमापूर ता. गेवराई जि. बीड (फरार) एक विधी संघर्ष बालक असे आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे हे करीत आहेत.



























































