लघवी प्रकरण: “पोलिसांची सुरक्षा हटल्यानंतर माझे काय होणार?” आदिवासी व्यक्ती अजूनही दहशतीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर भाजप कार्यकर्ता प्रवेश शुक्ला याने लघवी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेनंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भोपाळमधील निवासस्थानी पीडित आदिवासी व्यक्तीला बोलावण्यात आले व मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याचे पाय धुतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची माफी मागितली आणि त्यांना सर्व मदत देऊ केली. मात्र असे असूनही पीडित आदिवासी व्यक्ती दहशतीच्या वातावरणात जगात असल्याचे दिसून येत आहे.

“आता माझ्या घरी पोलीस आहेत, पण ते फक्त एक-दोन दिवसांसाठीच आहेत. पोलिसांची सुरक्षा हटल्यावर त्या लोकांनी मला पळवून नेले किंवा मारहाण केली तर? मी सरकारकडे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे,” अशी मागणी त्या पीडित व्यक्तीने केली आहे. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये यासंदर्भात वृत्त आले आहे.

सदर व्यक्ती राजकीय दबावामुळे इतका घाबरला आहे की त्याने आपल्या पत्नीच्या झालेल्या अपमानाचा उल्लेखही केला नाही आणि जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा माझ्यावर अत्याचार झाला नाही, असे तो म्हणत होता. यावेळी त्याने कबूल केले की, त्या घटनेनेनंतर तो इतका घाबरला होता की तो गावकऱ्यांशी खोटे बोलत राहिला, की व्हिडिओमध्ये मी नाही. त्यावेळी जर मी तक्रार दाखल केली असती तर मी अडचणीत आलो असतो असे तो म्हणाला.

या भागामध्ये अजूनही असणाऱ्या जातीभेदाबद्दल सांगताना तो म्हणाला की, “मी या घटनेबद्दल तक्रार केली नाही. कारण तो ब्राह्मण आहे, म्हणून मी काहीही बोललो नाही आणि त्याने जे केले ते मी स्वीकारले.

प्रवेशने त्याच्यावर लघवी का केली असे त्याला विचारले असता, तो म्हणाला की, “माझा त्याच्याशी कोणताही वाद किंवा भांडण नाही. त्याने ते असेच केले. तो दारूच्या नशेत होता.”