
>> सुहास मळेकर
शहरात नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला लोकल ट्रेनचा प्रवास करावा लागतो. किंबहुना तो दैनंदिन व्यवहाराचा भाग होऊन जातो आणि त्याची नंतर सुरळीत घडी बसते. मित्रमैत्रिणींचे चांगले ग्रुप तयार झाले की, प्रवासाचा वेळही चुटकीसारखा निघून जातो. या सुंदर सकारात्मक क्षणांचे पडसाद दिवसभराच्या कामात उमटतात आणि आपण दिवसभर ताजे टवटवीत राहतो…पण या प्रवासाची नेहमीची एक दुसरी बाजू वाटावी अशी घटना घडली.
त्यादिवशी फलाटावर नेहमीसारखीच गर्दी होती. त्या गर्दीत ट्रेनमध्ये चढताना दोन प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला. त्या गर्दीतही त्यांनी एकमेकांना दोष द्यायला सुरुवात केली. एकाने शिवी दिल्याने वातावरण तापले आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीचे पर्यावसन धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. ‘जाने दो भाई, जाने दो’ म्हणत काही प्रवासी भांडण सोडवायचा प्रयत्न करत होते. कोणीतरी वयस्क इसमाने म्हटले, ‘‘अरे कशाला सकाळी सकाळी भांडता? लोकांचा दिवस सकाळी तुमच्या शिव्या ऐकून खराब का करता?’’ इतर प्रवाशांनी त्याला दुजोरा दिला. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांची कॉलर सोडली. अशातच कोणीतरी आगीत पुन्हा तेल टाकले आणि दोघे पुन्हा तावातावाने भांडू लागले. ‘‘चल हिंमत है तो तू उतर अगले स्टेशनपर’’ ‘‘चल ना, डरता हूं क्या? उतर अगले स्टेशनपर’’ जिद्दीने ते उतरले, सोबत निव्वळ बघेसुद्धा उतरले. पुढे काय झाले माहीत नाही. एक गोष्ट कधीच कळत नाही. या गर्दीत छोटय़ा प्रवासात जरा धक्का लागण्याने त्यांचे काय नुकसान होत असते? कशासाठी हे आपला दिवस खराब करून घेतात आणि सोबत इतरांचाही दिवस खराब करतात. याला काही अपवादसुद्धा असतात. एकदा तर एका माणसाला दुसऱयाची छत्री लागून कपाळावर खरचटलेलेसुद्धा पाहिलेय, पण तो न रागावता ‘‘चालतं हो, गर्दीत लागणारच.’’ म्हणून बाजूला जाऊन शांत उभा राहिलेला पाहिलाय मी. त्याची वैचारिक क्षमता मोठी असेल. त्याला अशा वादविवादात काडीचा रस नसेल. कदाचित अशा छोटय़ा गोष्टीत शारीरिक, मानसिक गुंतवणूक करून त्याला त्याचा दिवस बिघडवायचा नसेल. मुक्कामी उतरताना वाटून गेले. ते दोघे आता त्या स्टेशनवर पुन्हा भिडले असतील का? ‘‘मी तुला घाबरत नाही’’ म्हणत एकमेकांच्या उरावर बसणे हा कसला स्वाभिमान? त्यांची इतर काही स्वप्ने नसतील का? त्यांच्या धडधाकट प्रकृतीला ते इजा करून घेतील का? त्यांच्या घरी त्यांची वाट पाहणारी कोणी माणसे नसतील का? बघे लोक तो तमाशा नुसताच बघत असतील का? खरंच दिवस खूप व्यथित गेला.






















































