विज्ञान-रंजन – अक्षरजुळणीची ‘ओळ’ख!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

हा लेख तुम्ही वाचत आहात तो हाताने लिहिला असला तरी त्याची अक्षरजुळणी कॉम्प्युटरवर झालीय आणि छपाई ऑफसेट प्रिंटिंग पद्धतीने. आता बहुतेक लेखक आपला लेख ‘युनिकोड’सारख्या अक्षरजुळणीत किंवा ‘वर्ड्स’मध्ये स्वतःच टाइप करतात. त्यामुळे एक टप्पा कमी होतो हे खरंच, पण ज्या काळात हे तंत्रज्ञान नव्हतं त्या काळातल्या मंडळींना हे थोडं जड जातं.

तर मूळ मुद्दा छपाई तंत्राच्या विकासक्रमाचा. प्राचीन काळी भूर्जपत्रावर (विशिष्ट झाडाची साल) किंवा कापडावर लिहिलं जायचं आणि कायम टिकणारं लेखन ताम्रपट, शिलालेख या स्वरूपात केलं जायचं. हे सगळं सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नव्हतं आणि साक्षरतेचं प्रमाणही खूपच कमी असल्याने वाचन फार मर्यादित होतं. बऱयाच गोष्टी पाठांतराने होत असत आणि परंपरेने या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असत. कोणीही कधीही केव्हाही वाचू शकेल असा अक्षरपट तयार करण्याची कल्पना चीनमधील सौन्ग राजवटीतल्या बी शॅन्ग या कल्पक व्यक्तीला सुचली. त्याने चिकणमातीची (क्ले) अक्षरं तयार केली. ही सुटी अक्षरं उलटी होती. त्यावर शाई लावून कागद दाबला की ‘छापील’ मजकूर दिसायचा. ही गोष्ट अकराव्या शतकातली. त्यावेळी आपल्याकडे कापडी पटावर किंवा शिलालेखांवर लेखन होत असे.

मात्र हा ‘क्ले टाइप’ नाजूक होता. तो ‘प्रेस’ केल्यावर तुटायचा. पुन्हा ती अक्षरं बनवावी लागायची आणि चीन भाषेत तर शेकडो मूळाक्षरं होती! त्यावर उपाय म्हणून लाकडी टाइप आला. मोठय़ा अक्षरांचा लाकडी ठोकळय़ांसारखा ‘टाइप’ मीसुद्धा पाहिलाय. त्याच्या पुढची पायरी होती ती धातूच्या अक्षरांची. साधारण तेराव्या शतकात आलेला लाकडी टाइपही तकलादू वाटायला लागल्यावर लोखंडी टाइप अवतरला. पंधराव्या शतकात अशा ‘टाइप’ची अक्षरजुळणी करून ‘वृत्तपत्रं’ही छापली जाऊ लागली. ती एखाद्या जाहिरात किंवा पत्रकासारखी एका पानाची असायची. कालांतराने ‘ट्रेडल मशीन’सारखं छपाईचं यंत्र 1440 मध्ये जर्मनीच्या जोहॅन्स गुटेनबर्ग यांनी शोधून काढलं. त्यासाठी लोखंडी अक्षरांचीही जुळणी करण्यात आली. या मशीनवरची छपाई आणि लोखंडी अक्षरजुळणी अगदी 1990 पर्यंत आपल्याकडे होत होती. ती खूप जवळून पाहता आली. त्यावेळी मोनो (एकेक) आणि लायनो (संपूर्ण ओळ) अशी अक्षरजुळणी करण्याचं तंत्र आलं. तेही नवं वाटत होतं.

सुटय़ा लोखंडी अक्षरांप्रमाणे वितळवता येणाऱया अॅल्युमिनियमसारख्या धातूच्या अक्षरांची निर्मिती यंत्राद्वारे होऊ लागल्यावर अक्षर जुळाऱयांसाठी (पंपोझिटर) भरपूर अक्षरं उपलब्ध होऊ लागली. त्यानंतरचा टप्पा होता लायनो टाइपचा.

एकेक अक्षर जुळवायला वेळ लागायचा. त्याऐवजी यंत्राद्वारे संपूर्ण ओळीचाच ठसा (मोल्ड) बनवता आला तर? असा विचार करून मर्जेन्थेलर यांनी ‘लायनो टाइप’ मशीन विकासित केलं. ओट्टमार मर्जेन्थेलर हे जर्मन होते. तिथे ते छोटी-मोठी कामं करायचे. काही वर्षांनी ते अमेरिकेत गेले. तिथे क्लेफिन आणि मूर यांना छपाईची त्वरित जुळणी होणारं काहीतरी हवं होतं. त्यांनी ते काम मर्जेन्थेलर यांच्याकडे सोपवलं. त्यांनी लायनो टाइप शोधला. मोनो आणि लायनो टाइपसेटिंगमध्ये ‘टायपिंग’ करण्याचा की-बोर्ड वापरण्याची पद्धत पहिल्यांदा आली. त्यानंतर बराच काळ त्यावर संशोधन होत गेलं आणि एका दशकाने 1886 मध्ये ‘न्यूयॉर्क ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने 3 जुलैचा अंक लायनो टाइप पद्धतीने छापाला. अवघ्या 47 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी हे मोठं काम केलं.

हे मोनो आणि लायनो टाइप आपल्याकडे 1995 पर्यंत मोठय़ा प्रमाणावर वापरात होते. पुढे प्लेटवरील प्रिंटिंग आणि कॉम्प्युटरचा वापर सुरू झाला आणि हाती अक्षरजुळणी जवळ जवळ थांबली. तरीसुद्धा देशात अनेक ठिकाणी पत्रिका, हॅण्डबिलं वगैरे छापण्याच्या छोटय़ा कामांसाठी अजूनही कुठे कुठे हाती अक्षरजुळणी आणि छोटय़ा ट्रेडल मशीनवर छपाई होते.

हाती अक्षरजुळणी करणारे कम्पोझिटर किती कुशल असत याचा अनुभव 1970 च्या दशकात घेतला आहे. हाती लिहून झालेला कागद त्यांच्याकडे दिल्यावर दुसरा लिहून होईपर्यंत छोटे छोटे लाकडी चौरस असलेल्या ‘केस’मधील अक्षरं वेगाने काढत ते ओळ पटकन तयार करीत. तेच काwशल्य आता वेगळय़ा स्वरूपात कॉम्प्युटरवर टायपिंग करणाऱयांना दाखवावं लागतं आणि आता तर ‘अक्षरजुळणी’, सेलपह्नमध्येही होते. त्याचा प्रिंट आऊट घेतला की झालं, परंतु यामागे एक प्रकारची संशोधनाची उत्क्रांती आहे हे लक्षात घ्यायला हवे.