
कोपरगाव शहरात बुधवारी सायंकाळी साडेसात-आठ वाजण्याच्या सुमारास नागरे पेट्रोलपंप इथे बिबट्या घुसल्याने पंपाजवळील दुकानदाराची भीतीने गाळण उडाली. यामुळे परिसरात खळबळ माजली होती. पेट्रोलपंपाजवळ बिबट्या आल्याची माहिती मिळताच तात्काळ वनविभागाला पाचारण करण्यात आले.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुर्शदपूर जेऊर पाटोदा या परिसरातून हा बिबट्या नागरे पेट्रोलपंपावर आला आणि त्यानंतर लोकांनी केलेल्या गोंधळामुळे तो राजपाल सोसायटीच्या बाजूला गेला. त्यानंतर रात्री पुन्हा जोशी नगर भागातून तो इंदिरापथ बैलबाजार या रस्त्यावर फिरताना दिसला. तिथून पुढे असलेल्या कर्मवीर नगरमध्ये काही लोकांना दिसला. शुक्रवारी खडकी पाण्याची टाकी, गवारे नगर, समता नगर या भागात बिबट्या फिरत असल्याचे एका स्थानिक नागरिकाने पाहिले. त्यामुळे ही माहिती परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कोपरगावात आता सर्रासपणे बिबट्याचा वावर होताना पाहायला मिळतो. इतके दिवस तालुक्यातील मुर्शदपूर व आसपासच्या उसाच्या शेतीत बिबट्याचं वास्तव्य आढळत आहे, मात्र आता थेट कोपरगावच्या शहरी भागातही बिबट्या घुसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण
कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात गाई, गाढव, डुकरे, कुत्रे ही मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. ही जनावरे रस्त्यावर रात्रंदिवस ठिकठिकाणी बसलेली असतात. त्यामुळे बिबट्यासारख्या प्राण्याला ही सोपी शिकार असल्याने बिबट्या या परिसरातून लवकर जाणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. बिबट्याच्या भीतीमुळे सकाळ-संध्याकाळ मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांचीही भीतीने गाळण उडाली आहे.
वन विभागाला आवाहन
ग्रामीण पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव यांनी दुपारी वन खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर भ्रमणध्वनीवरून संपर्क करून त्यांना बिबट्या शहरात फिरत असल्याची माहिती दिली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक देसले यांचे वन विभागाला केले आहे.





























































