साई संस्थानकडून 44 एकरावर वृक्षारोपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साईबाबांचा पर्यावरण रक्षणाचा संदेश जपत शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मौजे रूई येथील सुमारे 44 एकर क्षेत्रावर वृक्षलागवडीचा आज (शनिवारी) श्रीगणेशा करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांच्या हस्ते आंबा वृक्षाचे रोपण करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थानच्या आय. टी. आय. महाविद्यालयामधील विद्यार्थी, शिक्षक, संस्थान कर्मचारी यांनीही या कार्यात भाग घेतला. यापुढेही वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे शिवा शंकर यांनी सांगितले.

साई संस्थानची शिर्डी परिसरात विविध ठिकाणी पडिक जमीन आहे. या पडिक जमिनीवर संस्थानच्या वतीने वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व कर्मचाऱयांनी प्रत्येकी किमान 5 झाडांचे रोपण करून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला आहे.

श्रमदानातून पर्यावरण रक्षण

साईबाबांनीही आपल्या हयातीत वृक्षारोपणासह पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला होता. मंदिर परिसरातील लेंडी बाग साईबाबांनीच विकसित केली आहे. त्याच अनुषंगाने साई संस्थानने 44 एकर क्षेत्रावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला.

श्री साईबाबा संस्थानच्या मौजे रूई येथील क्षेत्रात सुरक्षिततेसाठी 2000 बांबूच्या झाडांचे रोपण करण्यासह 300 आंबा, चिंच, कडुनिंब आदी प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, बी. डी. दाभाडे, डॉ. आकाश किसवे, डी. टी. उगले, प्रज्ञा महांडुळे, अनिल भणगे, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.