
>> किरण खोत, (निवेदक, सूत्रसंचालक)
स्टेज फिअर नसणे हा उत्तम बोलण्यातील एक महत्त्वाचा पैलू आहे. एरवी भरपूर गप्पा मारणाऱया लोकांना जेव्हा स्टेजवर बोलायला सांगितले जाते किंवा माइक हातात पकडून बोलायला सांगितले जाते तेव्हा खूप घाबरतात.
स्टेजवरून बोलताना काही जणांना ब्लँक व्हायला होते, काही जणांचा आवाज कापतो, तर काहींचे शरीर लटपटू लागते. आपोआप मंचाची भीती निर्माण होते आणि मग आपल्या मनात एक न्यूनगंड तयार होतो.
नव्याने सुरुवात करताना दिग्गज वक्त्यांच्या बाबतीतसुद्धा हा सभाधीटपणा मुळात नव्हता. अगदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पहिला खटला चालवताना त्यांनादेखील नीट बोलता आले नव्हते. स्टेज फिअर एकदम जाणार नाही. यासाठी तुम्हाला नेट प्रॅक्टिसची आवश्यकता असते आणि म्हणूनच हा सभाधीटपणा आणण्यासाठी सुरुवातीला मित्रपरिवारात, त्याचसोबत ऑफिसमधील कर्मचाऱयांसोबत किंवा ज्या गटाची आपल्याला भीती वाटणार नाही, अशा छोटय़ा छोटय़ा समूहांसोबत सभा घेतल्या पाहिजेत.
सभाधीटपणा वाढवण्यासाठी आत्मबलाची खूप जास्त आवश्यकता असते, जे प्राणायाम आणि योगासनांच्या सहाय्याने वाढवता येते. आपल्या विषयाचा नीट अभ्यास केला आणि त्याचा सातत्याने सराव केला तर चारचौघांत आत्मविश्वासाने बोलणे तितके कठीण नाही.
सुरुवातीला विंगेत उभे राहून निरीक्षण करावे. त्यानंतर सहनिवेदक म्हणून स्टेजवर जावे. त्यानंतर एकटय़ाने किल्ला लढवावा. यासाठी वाचनसुद्धा तुम्हाला खूप चांगली मदत करू शकतो. वाचलेल्या पुस्तकातले मुद्दे लिहून काढल्यास ते आपल्या भाषणात वापरता येतात. भाषण करण्यापूर्वी मी या विषयावर का बोलणार आहे, असे प्रश्न स्वतःला विचारा आणि आपल्या भाषणाचा हेतू ठरवून घ्या. तुम्हाला ज्या विषयावर मनमुरादपणे बोलता येईल असे विषय सुरुवातीला निवडा. म्हणजे तुम्हाला व्यक्त होत असताना कोणत्याही संहितेची किंवा स्क्रिप्टची गरज लागणार नाही सर्वसामान्यांना समजेल अशा बोलीभाषेचा वापर करा. वक्त्याने उत्कृष्ट दर्जाचे शब्द वापरावेत किंवा आलंकारिक भाषा वापरावी, असे गरजेचे नसते. जितकं तुमचं वक्तव्य सहज तितकंच ते लोकांच्या सहज पचनी पडतं. थोडक्यात आत्मविश्वासाने आणि चटकदार बोलणारा वक्ता नेहमीच श्रोत्यांना आवडत असतो.
देवाने माणसालासुद्धा एक तोंड आणि दोन कान दिले आहेत. त्यामागे कमी बोलावे अन् जास्त ऐकावे हे माणसाकडून अपेक्षित आहे. त्यामुळे जितके साधेसोपे आणि थोडक्यात बोलाल, तितके तुमच्याकडे श्रोत्यांचे अधिक लक्ष असते हे लक्षात घ्यावे.




























































