मराठमोळ्या पदार्थांचा लज्जतदार अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उत्तरा मोने

एका मराठी माणसाने उभी केलेली मराठमोळ्या पदार्थांची लज्जतदार पंगत जर अनुभवायची असेल तर ‘आस्वाद’मध्ये या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गेलंच पाहिजे.

थालीपीठ, मिसळ, साबुदाणा खिचडी, पोळा उसळ, कोथिंबीरवडी, अळुवडी, पिठलेभाजी भाकरी आणि असे वेगवेगळे मराठी पदार्थ जिथे चवीने खाता येतात ते खवय्यांचं माहेरघर म्हणजे दादर शिवाजी पार्कमधलं आस्वाद हॉटेल. श्रीकृष्ण सरजोशी यांनी ‘आस्वाद उपाहार व मिठाईगृह’ची सुरुवात केली. 3 जानेवारी 1986 या दिवशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ‘आस्वाद उपाहार व मिठाईगृह’चा शुभारंभ शिवाजी पार्क, दादर इथे झाला.
श्रीकृष्ण सरजोशी हे मुळातले कोकणातले. कोकणातून मुंबईत आले आणि दादरमधल्या तृप्ती उपाहारगृहात त्यांनी काम करायला सुरुवात केली. पुढे प्रचंड मेहनत आणि जिद्द या जोरावर त्यांनी हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या प्रवासात त्यांची पत्नी मंगलाताई यांचाही मोलाचा वाटा आहे.

1999 मध्ये ‘आस्वाद’ची दुसरी पिढी म्हणजेच सूर्यकांत श्रीकृष्ण सरजोशी यांनी ‘आस्वाद’ची धुरा सांभाळायला सुरवात केली. 2006 मध्ये ‘आस्वाद’चं रूपांतर वातानुकूलित मराठमोळ्या उपाहारगृहात केलं. काही पदार्थही नव्या स्वरूपात इथे मिळू लागले. पुरणपोळी आइस्क्रीम, तिळगुळ आइस्क्रीम, नारळीभात आइस्क्रीम सारख्या खवय्यांच्या पसंतीस उतरतील अशा विविध आइस्क्रीम्ससुद्धा आता ‘आस्वाद’मध्ये उपलब्ध आहेत. अर्थात असे बदल जरी झाले तरी पदार्थांची चव आणि मराठी पदार्थ याची कास आस्वादने कधीच सोडली नाही. पाश्चिमात्य खाद्यपदार्थांची लाट जरी आली तरीही ‘आस्वाद’ने आपला मराठी बाणा आणि कणा सोडला नाही. म्हणूनच कदाचित 2015 मध्ये जागतिक कीर्तीचा ‘फुडी हब पुरस्कार’ हा लंडनमध्ये ‘आस्वाद’च्या ‘मिसळ’ला जाहीर करण्यात आला.

आज हा व्यवसाय पुढे नेताना आपले महाराष्ट्रीयन पदार्थ लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचावे हा वडिलांचा मुख्य उद्देश ते विसरले नाहीत. सूर्यकांत सरजोशी म्हणाले की, आम्ही आता पुरणपोळी आइस्क्रीम सुरू केलं. त्याला लोकांचा छान प्रतिसाद मिळाला. पारंपरिक पदार्थ चांगली सेवा देऊन पोहोचवू शकतो हाच प्रयत्न राहील.

संस्कृतीचं जतन
सूर्यकांत सरजोशी यांच्या दूरदृष्टीने आस्वाद नवनवीन उपक्रम राबवत आहेच, पण विस्मृतीत गेलेल्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीतील पाककृतीही सातत्याने लोकांना अनुभवायला मिळाव्या यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. यात त्यांच्या पत्नी स्मिता सरजोशी यांची मोलाची साथ लाभते. आज नव्या पिढीला या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीची गोडी लागावी, ती वाढावी आणि पिढय़ान्पिढय़ा ती जतन व्हावी, यासाठी संक्रांत थाळी, चैत्र थाळी, धुंदूरमास थाळी असे ऋतुमानानुसार विविध उपक्रम आस्वादमध्ये राबवले जातात. आलेल्या सर्वांचं स्वागत सुंदर रांगोळी, सनईचौघडा, हळद-कुंकू, अत्तर, फुल, गुरुजींच्या मंत्रोच्चाराने भारलेल्या वातावरणात होतं.