
जागतिक चित्रपटाचे अभ्यासक अशोक राणे यांना ‘फ्रिफेस्की’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिनेमासंदर्भातील लेखनाचा सर्वोत्तम पुरस्कार’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. त्यानिमित्त मुंबईत सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असलेल्या अशोक मुळ्ये यांच्या आयोजन व संकल्पनेतून अशोक राणे यांचा उद्योगपती दांपत्य महेश व उमा मुद्दा यांच्या निवासस्थानी 20-25 सिने पत्रकार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार आयोजित करण्यात आला होता. सोनाली कुलकर्णी व मीना कर्णिक यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारीसुद्धा उपस्थित होते. त्यांना आवडणाऱया चित्रपट व कलाकारांविषयी ते भरभरून बोलले. सोबत मुळ्ये काकांच्या मिश्कील फटकेबाजीने अजून रंगत आणली.
अशोक मुळ्ये हे सामाजिक, सांस्कृतिक माध्यम क्षेत्रांत विशेष कामगिरी करणाऱयांचा आवर्जून सत्कार आयोजित करतात. त्यांना प्रोत्साहन देणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो व यशस्वीतांचे असे कौतुक सोहळे ते निःस्वार्थपणे घडवून आणतात.





























































