
उजनीची आवर्तने पाण्याअभावी होत नसल्याने सीना नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर वाळूउपसा व वाहतूक करणारी यंत्रणा मोठय़ा प्रमाणावर सक्रीय झाली आहे. त्याकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने सीना नदीची चाळण होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने वेळच्या वेळी सीना पात्रात पाणी सोडले जात होते. त्यामुळे वाळूउपशावर बंधने येत होती. पण यावर्षी अद्यापि मोठा पाऊस न झाल्याने तसेच उजनीची आवर्तने थांबल्याने सीना नदी कोरडी पडली आहे. याचा फायदा वाळूमाफियांनी उचलला आहे. दरारोज शेकडो ब्रास वाळू हे माफिया चोरून विकत आहेत.
सध्या शासनाकडून वाळू धोरणाची अंमलबजावणी निट होत नसल्याने वाळूचा काळाबाजार प्रचंड वाढला आहे. गावकामगार तलाठी, सर्कलसह प्रांताधिकाऱयांनी लक्ष घालून या वाळूमाफियांविरोधात कारवाई करणे गरजेचे आहे. पण अशी कारवाई होताना दिसत नसल्याने याबाबत लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच महसूल विभागासह पोलीस प्रशासनाची याकडे डोळेझाक होत असल्याने नदींची चाळण होत आहे. त्यामुळे महसूलसह पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा नदीपात्रात फक्त खड्डे पाहायला मिळतील, असा नागरिकांचा सूर आहे.



























































