
मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्गिका 31 मार्च 2023पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; पण ही मार्गिका सुरू झाली नाही, अशी कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
मुंबई-गोवा महामार्गावरचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने या ठिकाणी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याशिवाय राजापूरनजीक कोदवली पेट्रोल पंपाजवळील एकच मार्ग सुरू असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केला होता. या विविध प्रश्नांवर रवींद्र चव्हाण यांनी लेखी उत्तरात माहिती दिली.
या महामार्गावरील पनवेल ते इंदापूर हा 84 कि.मी. लांबीचा महामार्ग केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत, तर इंदापूर ते झाराप हा 355 कि.मी. लांबीचा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. पनवेल ते इंदापूर या मार्गावरील 14.50 कि.मी. लांबीच्या डाव्या बाजूकडील एका मार्गिकेचे व्हाइट टॅपिंगचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. इंदापूर ते झाराप मार्गावरील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर जागेच्या उपलब्धतेअभावी प्रलंबित राहिल्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक एकाच बाजूने वळवण्यात आली होती. या ठिकाणी अपघात टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र आता उच्च विद्युत दाबाच्या वाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी आवश्यक त्या अतिरिक्त जागेचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच वाहिन्या स्थलांतरित करून या ठिकाणी दुहेरी वाहतूक सुरू करण्याची योजना असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.


























































