
>>रविप्रकाश कुलकर्णी
काही गोष्टी आठवायच्या नसतात, पण त्याचा विसरही पडू द्यायचा नसतो. ध्येयधोरण कसं जागतं ठेवायचं त्याची काही उदाहरणं सांगायला हवीत.
अफगाणिस्तानमधील गजनी गावाजवळ देयक गावात एक मोठी कबर असून त्याच्या समोर दोन लहान कबरी आहेत. आता यात काय वेगळेपण आहे? कबरीसमोर कबरी असतातच, पण इथे घडते ते वेगळे आहे. अफगाणी लोक या दोन छोटय़ा कबरीवर बूट, चप्पल यांचा मारा करून या कबरीची अवहेलना करतात. हा काय प्रकार आहे?
मोठी कबर ही मोहम्मद घोरीची असून त्यासमोरील दोन कबरी म्हणजे एक पृथ्वीराज चव्हाणची आहे आणि दुसरी पृथ्वीराजचा कवी मित्र साथीदार चंद्र बरदाई याची आहे असं सांगितलं जातं. याचाच अर्थ पृथ्वीराज चव्हाणचा अपमान आजही तिथे केलेला दिसतो. हे कशाकरिता तर शत्रूला विसरायचं नसतं हे पुन: पुन्हा ठसवण्यासाठी.
इथे मुद्दाम सांगायला हवं की, या गोष्टीला काहीही पुरावा नाही. इतिहास सांगतो पृथ्वीराजची हत्या अजमेर येथे झाली आणि ती क्रूरकर्मा मोहम्मद घोरीने केली (11 मार्च 1192). तेव्हापासून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला ग्रहण लागलं आणि ते सुटायला विसावं शतक उजाडायला लागलं. मोहम्मद घोरीची हत्या चौदा वर्षांनी सिंधू नदीच्या काठावर दमयक येथे झाली (15 मार्च 1206). मात्र मोहम्मद घोरीच्या देहाची विल्हेवाट कशी लागली याची नोंद नाही. मग घोरीची कबर कोणी बांधली? दुसरी गोष्ट या कबरीसमोर पृथ्वीराज चव्हाणची कबर कशी काय आली?
याचाच अर्थ पृथ्वीराज चव्हाणबद्दल कायम द्वेष निर्माण व्हावा त्यासाठी ही बनवाबनवी केलेली दिसते. ही हकीगत मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झालेल्या डॉ. नरसिंह परदेशी बघेल यांनी लिहिलेल्या ‘राय पिथोरा सम्राट पृथ्वीराज चव्हाण’ या ग्रंथात विस्ताराने सांगितलेली आहे. विद्वेष धगधगता कसा ठेवावा, कसा ठेवला जातो त्याचंच हे उदाहरण आहे.
आता आपल्याकडची एक हकीगत पाहा. इटावा तालुका फरुकाबाद या मार्गावर दत्तावली येथे एक मजार किंवा थडगे आहे. तेथून जाणारा प्रत्येक जण या थडग्याला चपला वा बुटाने बडवतो. असं केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होते असं समजलं जातं. या थडग्याला चुगलखोराची मजार असं म्हणतात. हा काय प्रकार आहे? याबाबत तीन गोष्टी सांगितल्या जातात.
पृथ्वीराज चव्हाण यांना इटावाचा राजा सुमेरसिंह चव्हाण मदत करायला गेला, पण दत्तावलीतील एका मुंशीने फितुरी करून मोहम्मद घोरीला माहिती पुरवली. परिणामी सुमेरसिंगची हत्या झाली. पृथ्वीराज चव्हाण यांना हे कळताच या फितूराला मृत्युदंड देण्यात आला. त्याचीच ही मजार. चुगलखोराला काय शिक्षा दिली जाते याची आठवण राहावी म्हणून आजही या मजारीवर चपला, बुटांचा मारा होतो.
म्हणजे प्रकार एक, मात्र दृष्टिकोन वेगवेगळा. अफगाणिस्तानात विद्वेष धगधगता ठेवला जातो, तर हिंदुस्थानात मात्र फितुरीला क्षमा नाही हे ठसवलं जातं.
संस्कृती संस्कृतीमध्ये फरक असतो असे म्हणतात ते हेच काय?





























































