
>> गणेश आचवल
माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझी मंगळागौर पूजा झाली होती, पण काही कारणाने ते मंगळागौरीचे खेळ तेव्हा होऊ शकले नव्हते. या गाण्याच्या निमित्ताने मी स्वतः त्या मंगळागौरीतील खेळांचा आनंद घेतला…सांगतेय गायिका सावनी रवींद्र.
सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले आहेत. मुख्य म्हणजे त्यातले मंगळागौरीचे गीत तर तुफान गाजत आहे. हे गीत गायले आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र हिने. या गाण्याची तिची आठवण सांगताना सावनी म्हणाली, ‘‘माझं लग्न 2018 मध्ये झालं आणि 2019 मध्ये ‘बाईपण भारी देवा’मधील मंगळागौरीचे गाणे गाण्याकरिता मला चित्रपटाची संगीतकार जोडी साई-पियूषचा फोन आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे असल्याने त्यांच्या चित्रपटासाठी गाण्याचे माझे स्वप्न आता पूर्ण होणार होते. केदार शिंदे यांच्या चित्रपटांची मी पूर्वीपासून चाहती होते. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या चित्रपटाचा एक भाग होण्याची संधी मला मिळणार होती. हे मंगळागौर गीत सहा विविध नायिकांवर चित्रित होणार होते आणि मग त्या नायिका म्हणजे वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब आणि सुकन्या कुलकर्णी-मोने हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. मुख्य म्हणजे या सहा नायिकांसाठी गायचे असल्याने आपल्याला आपल्या आवाजातून खूप उत्साह आणि ऊर्जा यांचा वापर करायचा आहे, हे लक्षात आले. शिवाय मंगळागौर आणि त्यातील गाण्यांचे पारंपरिक बोल हेसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्या शब्दांचे उच्चार, त्यातून जपली जाणारी आपली संस्कृती, मंगळागौरीचे खेळ हे सगळे लक्षात घेऊन मी ते गीत गायले, पण पहिल्यांदा मी ते गीत गायले तेव्हा माझ्या मनाचे समाधान झाले नव्हते. मी पुन्हा अधिक उत्साहात ते गीत ध्वनिमुद्रित केले.
‘बाईपण भारी देवा’मधील आणखी एका गाण्याबद्दल सावनीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्सा सांगितला. ती म्हणाली, ‘‘मंगळागौरीचे गाणे रेकॉर्ड करून दोन वर्षे झाली होती आणि 2021 मध्ये पियूषचा अचानक फोन आला आणि त्याने मला ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या गाण्याच्या दोन ओळी रेकॉर्ड करून पाठवायला सांगितल्या. मी तेव्हा गर्भवती होते. मला नववा महिना लागला होता. मला धाप लागत होती, पण तरीही त्या परिस्थितीत मी ते गाणे रेकॉर्ड करून फोनवरून पाठवले. तेव्हा लॉकडाऊनचा काळ सुरू होता. चित्रपटातील प्रसंगाला जसा आवाज हवा होता, तशाच स्वरात गीत रेकॉर्ड झाले होते. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या या वाटचालीत मीसुद्धा ‘आईपणाच्या’ भूमिकेतून प्रवास करत असल्याने खरोखरच हे ‘भारीपण’ मी अनुभवले.’’
माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझी मंगळागौर पूजा झाली होती, पण काही कारणाने ते मंगळागौरीचे खेळ तेव्हा होऊ शकले नव्हते. या गाण्याच्या निमित्ताने मी स्वतः त्या मंगळागौरीतील खेळांचा आनंद घेतला. ‘बाईपण भारी देवा’मधील गाणी आणि या चित्रपटाशी संबंधति माझ्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी आहेत. त्यामुळे हा चित्रपट नेहमीचा माझ्या हृदयाच्या जवळ राहील.























































