
उजनी धरणात गेल्या चार दिवसांत तब्बल आठ टक्के पाणीपातळीत वाढ झाली असून, अद्यापही उजनी उणे 26.39 टक्के आहे. दिलासादायक घटना म्हणजे उजनीत येणारा विसर्ग रविवारी सायंकाळी वाढला होता.
गेल्या चार दिवसांपासून उजनी धरण भीमा खोऱयात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे उजनीच्या वरील धरणात पाण्याचा साठा वाढत आहे. उजनीवर पावसाने अद्यापही म्हणावी तशी हजेरी लावली नसली तरी विसर्गाचा प्रवाह वाढल्याने उजनीतील पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे. 19 जुलै रोजी उजनी उणे 34.40 टक्क्यांवर होती ती रविवारी सायंकाळी वाढलेल्या विसर्गामुळे उणे 26.39 टक्क्यांवर आली आहे. जवळपास 8 टक्क्याने उजनी वधारली असून, तब्बल चार टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
सध्या उजनीत 488.860 मीटर पाणी असून, पाणीसाठा 1415.31 दशलक्ष घनमीटर इतका आहे. उजनीत आता 50 टीएमसी पाण्याचा साठा असून, उपयुक्त पाणीपातळी गाठण्यासाठी अद्यापही 13.98 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. रविवारी सायंकाळी दौंड येथून 18 हजार 185 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.





























































