सांगलीतील कुख्यात गुंड सच्या टारझनचा खून, हल्लेखोर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड सच्या उर्फ सचिन टारझन याच्यावर कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. हल्ल्यातील संशयित आरोपी स्वतःहून कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला. आपल्या नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

गणेश विनोद मोरे (वय 19, रा. अहिल्यानगर, सांगली) असे हल्लेखोराचे नाव आहे. गुंड सच्या टारझन याचे गणेशच्या नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध होते. त्याचा राग गणेशला होता. आज पहाटे सच्या घरात झोपलेला असताना गणेशने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यात त्याच्या डोक्यात तीन ते चार घाव घातले. शिवाय हल्ल्याला विरोध करताना सच्याच्या हाताची बोटेही तुटली. हल्ल्याची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सच्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर गणेश स्वतःहून कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला. गुंड सच्या टारझन रिक्षाचालक होता. महेश नाईक खून प्रकरणात त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. गेली दीड वर्षे झाली तो जामिनावर बाहेर आला होता.