‘पन्नास खोके एकदम ओक्के’ फेम रॅपर राजेश मुंगसेला अटकपूर्व जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘चोर आले पन्नास खोके घेऊन, एकदम ओक्के होऊन’ असे रॅप गाणार्‍या राजेश भीकचंद मुंगसे याला कल्याणच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधिश आर जी वाघमारे यांनी 15 हजार रुपायाच्या जातमुचालक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

शिंदे यांच्या गटात गेलेल्या व तेथे कोअर कमिटी मेंबर झालेल्या स्नेहल कांबळे यांनी राजेश यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यावरुन राजेश मुंगसे याच्याविरोधात भादंवि 505 (2), 504, 501, 438 कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला होता. यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी राजेश मुंगसे याला मदत केली. त्यांनी अ‍ॅड्. शुभम काहिटे यांच्यामार्फत राजेश यांच्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व दिलेला होता. आता कायमस्वरुपी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

अ‍ॅड्. काहिटे यांनी तक्रारदार स्नेहल कांबळे यांनी केलेले एक ट्विट न्यायालयात सादर केले. या ट्विटमध्ये स्नेहल कांबळे यांनी असे म्हटले होते की, ‘हे पन्नास खोक्याचे सरकारवाले युवकांना अग्नीवीरमधून रोजगार मिळवून देण्याच्या लायकीचेही ठेवणार नाही. शिंदे फडणवीस सरकार जवाब दो, कबतक खाओगे हमारा रोजगार?’ युक्तीवादात अ‍ॅड्. काहिटे यांनी म्हटले की, अशा प्रकारचे ट्विट करणार्‍या स्नेहल कांबळे यांना राजेश मुंगसे याच्याविरोधात फिर्याद देण्याचा अधिकारच पोहोचत नाही.

शिवाय राजेश मुंगसे यांनी आपल्या रॅपमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. या रॅपमुळे आपली बदनामी झाली अशी कोणाचीही तक्रार नाही. शिवाय सर्वोच्च न्यायालयाचे असे निर्देश आहेत की अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यापुर्वी आरोपीला नोटीस देणे गरजेचे होते जी दिली गेलेली नाही. राजेशकडून कोणतीही गोष्ट जप्त करणे बाकी नाही किंवा त्याच्यामुळे कुणाचे नुकसान वगैरे झालेले नाही. उपरोक्त युक्तीवादाअंती न्यायालयाने राजेश मुंगासे याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.