
>> स्पायडरमॅन
जगभरात अनेक सण, उत्सव, परंपरा वेगवेगळ्या पद्धतीने साजऱया होत असतात. हिंदुस्थानसारख्या विविध संस्कृतीने नटलेल्या देशात तर अनेक अजब प्रथांची रेलचेल आहे. अशा काही प्रथा सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात चर्चेलादेखील येत असतात. राजस्थानच्या जोधपूरमधील अशीच एक परंपरा सध्या अनेकांचा चर्चेचा विषय बनली आहे. या परंपरेमध्ये बायका पुरुषांना वेताच्या छडीने मारतात आणि पुरुषदेखील आनंदाने मार खातात. धिंगा गवर नावाच्या या उत्सवाला त्यामुळे ‘बेंत (वेत) मार उत्सव’ नावानेदेखील ओळखले जाते.
16 दिवस चालणाऱया या उत्सवात गवर मातेची पूजा केली जाते. सोळाव्या दिवशी सुवासिनी महिला पूर्ण रात्र घराबाहेर राहतात आणि पुरुषांना प्रेमाने वेताच्या छडीने मारतात. विशेषतः वहिन्या आपल्या अविवाहित दिराला आणि इतर अविवाहित मुलांना छडीने मारतात आणि ते अजून अविवाहित असल्याचे जाहीर करतात. अशी छडी मारल्याने त्यांचे लग्न लवकर होते अशी इथे श्रद्धा आहे. या सणात ‘16’ या आकडय़ाचे खूप महत्त्व आहे. सर्वप्रथम स्त्रिया कच्च्या रंगाने भगवान गणेश, त्यांचे वाहन असलेला उंदीर, महादेव शंकर आणि सूर्य, चंद्र, घागर घेतलेल्या स्त्राrचे चित्र रेखाटतात. त्यानंतर पूजा करणारी महिला 12 तास निर्जल उपवास करते आणि दिवसातून फक्त एकदा अन्न ग्रहण करते. ही पूजा 16 महिलांनी एकत्र मिळून करायची असते. ही संख्या न घटवता येते, ना वाढवता येते.
564 वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव चैत्र शुक्ल तृतीयेच्या दिवशी सुरू होतो आणि वैशाख कृष्ण पक्षाच्या तृतीयेपर्यंत चालतो. 1459 साली राव जोधा यांनी जोधपूरची स्थापना केली होती. तेव्हापासून हा उत्सव चालू असल्याची मान्यता आहे. सोळाही दिवस गवर मातेची पूजा केली जाते. महत्त्वाचे म्हणजे या सणामध्ये विधवा महिलादेखील सहभागी होतात. अशा प्रथेमुळे घरातदेखील सुखसमृद्धी नांदते अशी इथली मान्यता आहे.


























































